कोथरूड येथे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पूर्ण केले ‘एसआयआर’ मॅपिंग; नागरिकांना मोहिमेत सक्रिय सहभागी होण्याचे आवाहन
पुणे : भारत निवडणूक आयोगाच्या वतीने देशभरात मतदार याद्या अधिक पारदर्शक, अचूक आणि पूर्णपणे त्रुटीमुक्त करण्यासाठी ‘एसआयआर’ (SIR – Special Intensive Revision) म्हणजेच विशेष संक्षिप्त पुनरीक्षण मोहीम राबवली जात आहे. याच राष्ट्रीय कर्तव्याचा एक भाग म्हणून, राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी कोथरूड येथे आपले स्वतःचे ‘एसआयआर’ मॅपिंग (SIR Mapping) यशस्वीपणे पूर्ण केले.
यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या निवासस्थानी आलेल्या निवडणूक आयोगाच्या अधिकृत कर्मचाऱ्यांना त्यांनी ‘एन्युमरेशन फॉर्म’ (गणना पत्र) भरून दिला. तसेच मतदार यादीच्या अद्ययावतीकरणासाठी आवश्यक असलेली सर्व अचूक माहिती सादर करत आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडले.
या प्रसंगाचे महत्त्व अधोरेखित करताना मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, मतदार याद्या पारदर्शक आणि अचूक असणे ही सशक्त लोकशाहीची पहिली पायरी आहे. त्यांनी कोथरूड मतदारसंघासह संपूर्ण महाराष्ट्रातील सुजाण नागरिकांना नम्र आवाहन केले आहे की, आपल्या परिसरात येणाऱ्या बीएलओ (BLO – बूथ लेव्हल ऑफिसर) किंवा निवडणूक विभागाच्या कर्मचाऱ्यांना योग्य व अचूक माहिती द्यावी. तसेच, आवश्यक फॉर्म वेळेत भरून देऊन या राष्ट्रीय मोहिमेत आपले सक्रिय योगदान नोंदवावे आणि आपली लोकशाही अधिक मजबूत करावी.