मुंबईच्या मानखुर्द येथील घर कोसळल्याच्या दुर्घटनेतील मृतांना मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून श्रद्धांजली; पीडितांच्या वारसांना शासनातर्फे प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत जाहीर
मुंबई, ६ जुलै २६ : मुंबईतील मानखुर्द परिसरात एक निवासी घर कोसळून झालेल्या दुर्दैवी दुर्घटनेत ६ निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत वेदनादायी आणि धक्कादायक आहे. या भीषण अपघाताबद्दल राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी तीव्र दुःख व्यक्त केले असून, दुर्घटनेतील सर्व मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.
या कठीण प्रसंगात महायुती सरकार शोकाकुल कुटुंबीयांच्या अथांग दुःखात पूर्णपणे सहभागी आहे, अशा भावना मंत्री पाटील यांनी व्यक्त केल्या. या भीषण दुर्घटनेची गंभीर दखल घेत शासनाच्या वतीने मृतांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची तातडीची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे.
तसेच, दुर्घटनेतील पीडितांना आणि त्यांच्या पाठीशी उरलेल्या कुटुंबांना सर्वतोपरी साहाय्य आणि आवश्यक वैद्यकीय उपचार मिळवून देण्यासाठी स्थानिक प्रशासन व आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा घटनास्थळी पूर्ण तत्परतेने कार्यरत असल्याची माहितीही मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.