पुणे जिल्ह्यात अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर आज शाळांना सुट्टी; मंत्री चंद्रकांत पाटील यांचे पुणेकरांना अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर न पडण्याचे आवाहन
पुणे, ०६ जुलै २६ : हवामान विभागाने आज ६ जुलै रोजी पुणे जिल्ह्यासाठी ‘रेड अलर्ट’ (Red Alert) जारी केल्यामुळे, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा मुख्य विचार करून जिल्ह्यातील सर्व शाळांना अधिकृत सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. या संभाव्य अतिवृष्टीच्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर, राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सर्व पुणेकर नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुणेकरांशी संवाद साधताना सांगितले की, हवामान खात्याने दिलेला अतिवृष्टीचा तीव्र इशारा पाहता, नागरिकांनी अत्यंत अत्यावश्यक काम असल्याशिवाय विनाकारण घराबाहेर पडणे टाळावे तसेच, पाण्याचा वेगवान प्रवाह लक्षात घेता नदी, नाले, पूल आणि इतर सर्व धोकादायक क्षेत्रांपासून नागरिकांनी सुरक्षित दूर राहावे आणि स्थानिक प्रशासनाकडून वेळोवेळी मिळणाऱ्या अधिकृत सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असेही त्यांनी नमूद केले.
या आपत्कालीन परिस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या सर्व स्थानिक कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी आपापल्या भागातील नागरिकांच्या मदतीसाठी आणि कोणत्याही आपत्ती व्यवस्थापनासाठी २४ तास तत्पर राहावे, अशा कडक सूचनाही मंत्री पाटील यांनी या निमित्ताने दिल्या आहेत.