मणिपूर येथील अपघातात वीरमरण आलेले धुळ्याचे सुपुत्र शिपाई जयेश माळी यांना मंत्री चंद्रकांत पाटील यांची भावपूर्ण श्रद्धांजली
मुंबई : मणिपूर येथे गस्ती मोहिमेदरम्यान सैन्यदलाचे वाहन तलावात घसरून झालेल्या दुर्दैवी अपघातात धुळे जिल्ह्यातील रामी गावचे सुपुत्र आणि भारतीय सैन्यदलात नर्सिंग असिस्टंट म्हणून कार्यरत असलेले शिपाई जयेश माळी यांना वीरमरण आले. या घटनेबद्दल राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दुःख व्यक्त करत या शूर जवानास भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.
आपल्या शोकसंदेशात मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, मणिपूर येथील दुर्दैवी अपघातात धुळे जिल्ह्यातील रामी गावचे सुपुत्र शिपाई जयेश माळी यांना वीरमरण आले, ही बातमी अत्यंत दुःखद आणि मन हेलावून टाकणारी आहे. मातृभूमीच्या रक्षणासाठी आणि देशसेवेचे पवित्र कर्तव्य बजावताना सर्वोच्च बलिदान देणाऱ्या या शूर जवानास भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.
पुढे ते म्हणाले की, त्यांच्या या बलिदानाचा देश सदैव ऋणी राहील. या अत्यंत कठीण प्रसंगी आम्ही माळी कुटुंबीयांच्या दुःखात पूर्णपणे सहभागी आहोत. त्यांना हे अपार दुःख सहन करण्याचे बळ मिळो आणि दिवंगत जयेश माळी यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.