विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन ७ ते १८ डिसेंबर दरम्यान नागपुरात; कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीस मंत्री चंद्रकांत पाटील यांची उपस्थिती
मुंबई, १८ नोव्हेंबर : महाराष्ट्र विधिमंडळाचे आगामी हिवाळी अधिवेशन सोमवार, दि. ७ डिसेंबर ते शुक्रवार, दि. १८ डिसेंबर २०२६ या कालावधीत उपराजधानी नागपूर येथे आयोजित करण्यात येणार आहे. मुंबईतील विधानभवनात विधानसभा आणि विधानपरिषदेच्या विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली असून, या बैठकीस राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण तथा संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित होते.
या बैठकीत दोन आठवड्यांच्या विधिमंडळ कामकाजाच्या नियोजनावर सविस्तर चर्चा करून अधिवेशनाचा कालावधी निश्चित करण्यात आला. याविषयी बोलताना मंत्री चंद्रकांत पाटील यांनी नमूद केले की, “राज्याच्या विकासाशी संबंधित महत्त्वपूर्ण प्रश्न, जनतेच्या अपेक्षा, विविध धोरणात्मक विषय आणि लोकहिताच्या मुद्द्यांवर सविस्तर व सकारात्मक चर्चा घडवून आणण्याच्या दृष्टीने हे हिवाळी अधिवेशन अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे.”
विधानभवनात पार पडलेल्या या बैठकीस विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, विधानपरिषदेचे उपसभापती सचिन अहिर, विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यासह विधानसभा व विधानपरिषदेचे सदस्य आणि संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.