संतपीठाच्या विकासासाठी तातडीने 1 कोटींचा निधी – मंत्री चंद्रकांत पाटील

7

मुंबई : सध्या संतपीठ हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा एक विभाग म्हणून कार्यरत आहे. संतपीठाच्या विकासासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याबाबत शासन सकारात्मक असून, तातडीच्या गरजांसाठी 1 कोटी रुपयांचा निधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच संस्थेने मागितलेल्या 35 कोटी रुपयांच्या निधीबाबतही आवश्यक कार्यवाही करण्यात येईल, अशी माहिती मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानपरिषदेत दिली.

सदस्य श्रीकांत भारतीय यांनी म.वि.प. नियम 97 अन्वये याविषयी विधानपरिषदेत अल्पकालीन चर्चा उपस्थित केली होती.

चंद्रकांत पाटील म्हणाले, सध्या संतपीठामध्ये 2021 ते 2025 या कालावधीत 1,072 विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतले असून, यंदापासून एक वर्षाचा पदवी अभ्यासक्रम सुरू करण्याचा प्रयत्न केला जात आहे. संतपीठासाठी काही बांधकामे पूर्ण करणे तसेच प्राध्यापक आणि अध्यापकांच्या मानधनासाठी तातडीने निधीची आवश्यकता असल्याने 1 कोटी रुपयांचा निधी वितरित केला जाईल. उर्वरित बांधकामांच्या गरजांचा आढावा घेऊन आवश्यक निधीही उपलब्ध करून दिला जाईल.

राज्यात अलीकडेच मराठी भाषा विद्यापीठाची स्थापना करण्यात आली असून त्यालाही अधिक सक्षम करण्यात येत असल्याचे सांगत, दिव्यांगांसाठी स्वतंत्र विद्यापीठ तसेच आदिवासींसाठी स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करण्याबाबत आलेल्या सूचनांचाही शासन स्तरावर एकत्रितपणे विचार सुरू असल्याचे पाटील यांनी सांगितले.

संतपीठाचे स्वतंत्र विद्यापीठात रूपांतर करण्याच्या प्रस्तावावरही शासन सकारात्मक असून, अशा विद्यापीठासाठी सुमारे 300 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. त्यामुळे टप्प्याटप्प्याने विकासाची प्रक्रिया राबविण्यात येईल. वारकरी संप्रदायाच्या अभ्यासाला चालना देण्यासाठी तज्ज्ञ आणि संबंधित मान्यवरांना या प्रक्रियेत सहभागी करून संतपीठाचा सर्वांगीण विकास करण्यात येईल, असे पाटील यांनी स्पष्ट केले.

Get real time updates directly on you device, subscribe now.