महाराष्ट्रातील तीन प्रतिभावान कलाकारांना राष्ट्रपतींच्या हस्ते ‘ललित कला अकादमी राष्ट्रीय पुरस्कार’; मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून गौरव
मुंबई : नवी दिल्ली येथील ललित कला अकादमीच्या ६५ व्या राष्ट्रीय कला प्रदर्शनात आणि तिसऱ्या ‘प्रिंट बिनाले इंडिया’मध्ये महाराष्ट्रातील तीन प्रतिभावान कलाकारांना महामहिम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रतिष्ठित ‘ललित कला अकादमी राष्ट्रीय पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले आहे. राष्ट्रीय स्तरावरील या सर्वोच्च बहुमानाबद्दल राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी तिन्ही कलाकारांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.

पुरस्कार विजेते कलाकार आणि त्यांच्या कलाकृती:
राष्ट्रीय पातळीवर महाराष्ट्राचा नावलौकिक वाढवणाऱ्या खालील तीन कलाकारांना हा गौरव प्राप्त झाला आहे:
• रमेश थोरात : ‘अनटाइटल्ड – II’ (Untitled – II) या उत्कृष्ट तैलचित्रासाठी (Oil Painting).
• सिद्धार्थ शिंगाडे : ‘ट्रीज’ (Trees) या मिश्र माध्यमातील (Mixed Media) अप्रतिम कलाकृतीसाठी.
• प्रितम देवसकर : ‘ऑफ टाइम अँड द सिटी’ (Of Time and the City) या वैशिष्ट्यपूर्ण प्रिंटमेकिंग (Printmaking) कलाकृतीसाठी.

महाराष्ट्राच्या समृद्ध कलापरंपरेचा गौरव: मंत्री चंद्रकांत पाटील
या यशाबद्दल आनंद व्यक्त करताना मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, “आपल्या अतुलनीय कलासाधनेतून राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राची मान उंचावणाऱ्या रमेश थोरात, सिद्धार्थ शिंगाडे आणि प्रितम देवसकर या तिन्ही कलाकारांचा मला सार्थ अभिमान आहे. त्यांच्या या कलाकृतींमधून महाराष्ट्राची समृद्ध कलापरंपरा आणि सर्जनशीलतेचा वारसा राष्ट्रीय स्तरावर अधोरेखित झाला आहे.” तसेच, या तिन्ही कलाकारांच्या हातून भविष्यातही अशाच अनेक उत्कृष्ट कलाकृती साकार होवोत, अशा शब्दांत त्यांनी कलाकारांना भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.