महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय : २८२ नौदल अग्निवीरांना पोलीस शिपाई पदावर नियुक्ती; नियुक्तीचे आदेश जारी
मुंबई : देशाच्या रक्षणासाठी समर्पित भावनेने सेवा बजावून परतणाऱ्या अग्निवीरांना शासकीय सेवेत सामावून घेण्याच्या धोरणात्मक निर्णयानुसार, महाराष्ट्र शासनाने २८२ नौदल अग्निवीरांना पोलीस शिपाई पदावर नियुक्ती देण्यास मंजुरी दिली आहे. राज्य शासनाने या माजी अग्निवीरांच्या नियुक्तीचे अधिकृत आदेशही प्रदान केले असून, या निर्णयाचे राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्वागत केले आहे.
१५० डेकसाईड आणि १३२ इंजिनसाईड खलाशांचा समावेश
पोलीस दलात थेट नियुक्ती मिळालेल्या या एकूण २८२ अग्निवीरांमध्ये १५० खलाशी डेकसाईड (Deckside) आणि १३२ खलाशी इंजिनसाईड (Engineside) अशा दोन वेगवेगळ्या तांत्रिक विभागांतील जवानांचा समावेश आहे. नौदलातील शिस्त आणि तांत्रिक अनुभवाचा महाराष्ट्र पोलीस दलाच्या सक्षमीकरणासाठी मोठा फायदा होणार आहे.
मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून महायुती सरकारचे आभार
या महत्त्वाकांक्षी निर्णयाची अत्यंत प्रभावी आणि गतिमान अंमलबजावणी केल्याबद्दल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत. माजी सैनिकांना आणि अग्निवीरांना त्यांच्या देशसेवेचा मान ठेवून शासकीय सेवेत हक्काची संधी उपलब्ध करून देण्याचे सरकारचे हे पाऊल कौतुकास्पद असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
पोलीस शिपाई म्हणून रुजू होणाऱ्या सर्व २८२ जवानांचे अभिनंदन करताना मंत्री पाटील म्हणाले, “नौदलातील देशसेवेनंतर आता पोलीस दलाच्या माध्यमातून जनसेवा करण्याची मोठी संधी या तरुणांना मिळाली आहे. या नव्या प्रवासासाठी त्यांना हार्दिक शुभेच्छा! त्यांच्या हातून देशाची आणि जनतेची सेवा अविरतपणे घडो, हीच सदिच्छा.”