कला शिक्षण विभागाच्या कामकाजाला अधिक गती द्या; उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचे संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश
मुंबई : मंत्रालयात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कला शिक्षण विभागाशी संबंधित विविध प्रलंबित विषयांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी कला संचालनालयाच्या कामकाजाचा आढावा घेऊन प्रलंबित प्रकरणे निश्चित कालमर्यादेत निकाली काढण्याबरोबरच विभागाच्या कार्यक्षमतेत अधिक गती आणण्याच्या सूचना संबंधित मंत्री चंद्रकांत पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
बैठकीत कला शिक्षण विभागाच्या प्रशासकीय कामकाजाची सद्यस्थिती, विविध योजनांची अंमलबजावणी, प्रलंबित प्रस्ताव तसेच आगामी कार्ययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. विद्यार्थी, शिक्षक आणि कला शिक्षण संस्थांच्या हिताशी निगडित प्रत्येक विषयाला सर्वोच्च प्राधान्य देत सर्व कामे गुणवत्तापूर्ण आणि वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश मंत्री पाटील यांनी दिले.
या बैठकीस उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, महाराष्ट्र राज्य कला संचालनालयाचे संचालक डॉ. किशोर इंगळे, महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळाचे संचालक विनोद दांडगे तसेच विभागातील संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.