कोथरूडमध्ये रंगला भक्तीचा सोहळा! मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सपत्नीक अनुभवली महेश काळे आणि राहुल देशपांडे यांची ‘अभंग वारी’

8

पुणे : आषाढी एकादशीच्या पावन आणि मंगलमय मुहूर्तावर कोथरूड मतदारसंघ विठ्ठलभक्तीच्या रसात पूर्णपणे न्हाऊन निघाला. निमित्त होते कोथरूड येथे शनिवारी आषाढी एकादशीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्रातील दोन दिग्गज शास्त्रीय गायक महेश काळे आणि राहुल देशपांडे यांच्या ‘अभंग वारी’ या विशेष कार्यक्रमांचे. या दोन्ही अविस्मरणीय आणि सुश्राव्य भक्ती सोहळ्यांना राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी आपल्या सुविद्य पत्नीसह उपस्थित राहून विठ्ठलनामाचा गजर अनुभवला.

सुप्रसिद्ध गायक महेश काळे यांच्या मधुर स्वरातील विठ्ठलनाम, संतवचनांचे अभंग आणि भक्तीरसाने ओतप्रोत सादरीकरणामुळे संपूर्ण वातावरण भक्तीमय झाले होते. त्यांच्या स्वरांनी उपस्थित प्रत्येक रसिक वारकरी भावनेत तल्लीन झाला होता. तर दुसऱ्या बाजूला, सुप्रसिद्ध गायक राहुल देशपांडे यांनी आपल्या उत्कृष्ट आणि कसदार गायकीतून संतवाङ्मयातील निवडक अभंग सादर केले. त्यांच्या सुरावलींनी संपूर्ण सभागृह अक्षरशः विठ्ठलनामाने दुमदुमून गेले होते.

या दुहेरी भक्ती सोहळ्याचा साक्षीदार झाल्यानंतर आपला आनंद व्यक्त करताना मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, आषाढी एकादशीच्या निमित्ताने महेशजी आणि राहुलजी यांच्या स्वरांच्या माध्यमातून पांडुरंगाचे रूप अनुभवता आले. या अविस्मरणीय भक्तीसोहळ्यामुळे मनाला विलक्षण शांतता, समाधान आणि अथांग आनंद लाभला आहे. विठ्ठल नामाची ही अखंड भक्ती आणि आपल्या थोर संतपरंपरेचा अमूल्य वारसा पुढील पिढ्यांपर्यंत असाच अविरत पोहोचत राहो, हीच माऊली पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना!

या दोन्ही कार्यक्रमांना पुण्यातील संगीत रसिक, ज्येष्ठ नागरिक, वारकरी भाविक आणि भाजपचे स्थानिक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कोथरूडकरांनी या सुश्राव्य भक्ती मेळाव्यांचे विशेष कौतुक केले.

Get real time updates directly on you device, subscribe now.