पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणूक: प्रोग्रेसिव्ह संस्थेने मतदार नोंदणीवर विशेष भर द्यावा; मंत्री चंद्रकांत पाटील यांचे आवाहन
पुणे : पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुणे येथे प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे संचालक मंडळ, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांशी थेट संवाद साधला. या आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने प्रोग्रेसिव्ह संस्थेने मतदार नोंदणीवर विशेष भर द्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
या महत्त्वपूर्ण बैठकीत बोलताना मंत्री चंद्रकांत पाटील यांनी संस्थेतील पदवीधर आणि शिक्षकांची जास्तीत जास्त मतदार नोंदणी करून घेण्याच्या सूचना दिल्या. लोकशाहीच्या या उत्सवात प्रत्येक पात्र शिक्षक आणि पदवीधराचा सहभाग महत्त्वाचा असून, प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीने यात पुढाकार घेऊन शंभर टक्के नोंदणीसाठी प्रयत्न करावेत, यावर त्यांनी भर दिला.
संस्थेच्या सर्व शाखांमधील पात्र पदवीधर आणि शिक्षकांची नावनोंदणी तातडीने पूर्ण करणे. शिक्षक व कर्मचाऱ्यांमध्ये मतदानाचा हक्क आणि नोंदणी प्रक्रियेबाबत जागरूकता निर्माण करणे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संस्था चालक आणि कर्मचाऱ्यांनी एकत्रितपणे नियोजन करणे, असे महत्वाचे मुद्दे पाटील यांनी यावेळी मांडले.
याप्रसंगी संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. गजानन एकबोटे, उपकार्यवाहक सौ. ज्योत्स्ना एकबोटे, सचिव शामकांत देशमुख, प्राचार्य डॉ. निवेदिता एकबोटे यांच्यासह सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.