भाजपा पुणे शहर सांस्कृतिक आघाडीच्या नवनियुक्त कार्यकारिणीची घोषणा; मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा
पुणे : भारतीय जनता पक्ष पुणे शहराच्या वतीने आगामी काळातील संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्यासाठी आज ‘भाजपा पुणे शहर सांस्कृतिक आघाडीच्या’ नवनियुक्त कार्यकारिणीची अधिकृत घोषणा करण्यात आली. या नवनियुक्त कार्यकारिणीतील सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि भाजपा पुणे शहर अध्यक्ष धीरज घाटे यांनी मनःपूर्वक अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस व कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी शहराध्यक्ष धीरज घाटे, आ. हेमंत रासने, सरचिटणीस दीपक पोटे, प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर, सांस्कृतिक आघाडीचे शहराध्यक्ष योगेश सुपेकर, स्मिता पाटील यांच्यासह आघाडीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांस्कृतिक आघाडीच्या महत्त्वावर प्रकाश टाकला. ते म्हणाले, भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रवादाच्या विचारधारेचा प्रसार करणे आणि पुण्याच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचे जतन व संवर्धन करण्यासाठी ही नवनियुक्त सांस्कृतिक आघाडी आगामी काळात निश्चितच अत्यंत प्रभावीपणे कार्य करेल, असा मला दृढ विश्वास आहे.
यावेळी भाजपा पुणे शहर अध्यक्ष धीरज घाटे यांनीही नवनियुक्त कार्यकारिणीचे कौतुक केले. ते म्हणाले, कला, संस्कृती आणि सामाजिक बांधिलकी हे समाजाला जोडण्याचे मोठे माध्यम आहे. या माध्यमाचा प्रभावी वापर करून पक्षाचा विचार समाजाच्या सर्व घटकांपर्यंत, विशेषतः तरुण आणि कलाकारांपर्यंत पोहोचविण्यासाठी ही नवीन कार्यकारिणी जोमाने काम करेल.