३१ ऑगस्टला पुण्यात भाजपा प्रदेश कार्यसमितीची बैठक; ३ हजारांहून अधिक नेत्यांच्या उपस्थितीसाठी नियोजन समिती सज्ज

11

पुणे : भारतीय जनता पार्टीच्या वतीने ३१ ऑगस्ट २०२६ रोजी पुणे येथे आयोजित करण्यात आलेल्या आगामी ‘प्रदेश कार्यसमिती’ बैठकीच्या पार्श्वभूमीवर, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे शहर भाजपाने जय्यत तयारी सुरू केली आहे. या महत्त्वाच्या बैठकीचे नियोजन चोख आणि यशस्वी करण्यासाठी शहर भाजपाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची विशेष आढावा बैठक पार पडली. या बैठकीस राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ, शहराध्यक्ष धीरज घाटे, महापौर मंजुषा नागपुरे, प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे यांच्यासह शहरातील प्रमुख पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

या बैठकीत मार्गदर्शन करताना मंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले की, ही बैठक अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने पार पडण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने आपल्यावर सोपवलेली जबाबदारी चोख पार पाडावी. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या मोठ्या राबत्यामध्ये नियोजनात कोणतीही त्रुटी राहणार नाही, याची सर्वांनी काटेकोर काळजी घ्यावी, अशा कडक सूचना त्यांनी दिल्या.

पत्रकार परिषदेत शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी मांडली नियोजनाची रूपरेषाया आगामी भव्य बैठकीच्या अनुषंगाने भाजपा पुणे शहर कार्यालयात विशेष पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना भाजपा शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी सांगितले की, ही महत्त्वपूर्ण बैठक प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.

या ऐतिहासिक बैठकीसाठी संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून भाजपचे ज्येष्ठ नेते, केंद्रीय व राज्य मंत्री, आमदार, खासदार, प्रमुख पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी असे ३ हजारांहून अधिक मान्यवर पुण्यात उपस्थित राहणार आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या लोकसंग्रहाच्या दृष्टीने पुढील व्यवस्था निश्चित करण्यात आल्या आहेत. बैठक स्थळावर उपस्थित राहणाऱ्या ३ हजार प्रतिनिधींसाठी अत्याधुनिक आणि सुसज्ज व्यवस्था केली आहे. बाहेरून येणाऱ्या सर्व लोकप्रतिनिधींसाठी पुण्यात सुयोग्य निवास आणि भोजनाचे उत्कृष्ट नियोजन करण्यात आले आहे. शहरात कोणत्याही प्रकारची वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून स्वतंत्र वाहतूक व पार्किंग मार्गिका आखण्यात आल्या आहेत.

 

 

Get real time updates directly on you device, subscribe now.