पुणे शहरात उद्या भाजपची भव्य ‘मशाल यात्रा’; पंतप्रधान नरेंद्र मोदी साधणार ऑनलाईन संवाद
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुजरातचे मुख्यमंत्री ते देशाचे पंतप्रधान अशा सलग दोन दशकांहून अधिक काळातील ऐतिहासिक विकासपर्वाचा आणि राष्ट्रसमर्पणाचा गौरव करण्यासाठी पुणे शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने ‘सेवा, सुशासन पर्वा’ अंतर्गत विविध अभियानांचे आयोजन करण्यात आले आहे. या अभियानाचा एक भाग म्हणून उद्या, बुधवार दिनांक ७ ऑक्टोबर २०२६ रोजी शहरातील प्रत्येक प्रभागात भव्य ‘मशाल यात्रेचे’ आयोजन करण्यात आले आहे.
पुणे शहर भाजपच्या वतीने आयोजित बैठकीत या अभियानाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. या प्रसंगी बोलताना राज्याचे कॅबिनेट मंत्री ना. चंद्रकांत पाटील म्हणाले की, “मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या गुजरातपासून सुरू झालेल्या आणि आज संपूर्ण देशाला विकास व सुशासनाच्या दिशेने घेऊन जाणाऱ्या २५ वर्षांच्या सेवापर्वाचा हा गौरव आहे. ‘जनसेवा हीच राष्ट्रसेवा’ या भावनेतून भाजपच्या प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्त्याने या सेवा, सुशासन पर्वात सक्रियपणे सहभागी व्हावे.”
‘शुभारंभ हॉल’ येथे होणार सांगता; पंतप्रधान करणार मार्गदर्शन
उद्या ७ ऑक्टोबर रोजी शहरातील सर्व प्रभागांमधून निघणाऱ्या या भव्य मशाल यात्रेची सांगता ‘शुभारंभ हॉल’ येथे होणार आहे. या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे, याच दिवशी मा. पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी हे तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सर्वांशी ऑनलाईन संवाद साधणार आहेत आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
या भव्य मशाल यात्रेत आणि ऑनलाईन संवाद सोहळ्यात पुणे शहरातील नागरिकांनी आणि भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन भाजप शहर कार्यकर्त्यांच्या वतीने करण्यात आले आहे.
या बैठकीस शहराध्यक्ष धीरज घाटे, गटनेते गणेश बिडकर, स्थायी समिती सभापती श्रीनाथ भिमाले, शहर सरचिटणीस व अभियान प्रमुख सुशील मेंगडे, नगरसेवक पुनीत जोशी, राघवेंद्र बापू मानकर, रवींद्र साळेगावकर, माजी नगरसेवक दीपक पोटे, वर्षाताई डहाळे, युवा मोर्चा अध्यक्ष दुष्यंत मोहोळ, महिला मोर्चा अध्यक्षा मनीषा लडकत, रमेश परदेशी यांच्यासह भाजपाचे सर्व नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते.