पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने सातारा व सांगली जिल्ह्याची नियोजन बैठक संपन्न

4

पुणे, ९ ऑक्टोबर : पुणे येथे पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने सातारा व सांगली जिल्ह्याची नियोजन बैठक प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीस उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची देखील प्रमुख उपस्थिती होती .

या बैठकीत निवडणुकीच्या नियोजनाचा आढावा घेत प्रदेशाध्यक्षांनी सर्व पदाधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. निवडणुकीत भाजपा-महायुतीच्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी सर्वांनी समन्वयाने आणि जोमाने काम करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात शिक्षण, कौशल्यविकास आणि रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करण्याला प्राधान्य दिले जात आहे. युवा पिढीला सक्षम बनवतानाच शिक्षक आणि पदवीधरांच्या अपेक्षांना न्याय देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. विकासाभिमुख नेतृत्व, संघटनात्मक ताकद आणि कार्यकर्त्यांच्या समर्पित योगदानाच्या बळावर आगामी निवडणुकीत भाजपा-महायुतीच्या दोन्ही उमेदवारांच्या विजयासाठी एकजुटीने आणि पूर्ण ताकदीने कार्य करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

या बैठकीत निवडणुकीच्या दृष्टीने संघटनात्मक तयारी, मतदारांशी संपर्क, स्थानिक पातळीवरील नियोजन आणि पुढील कार्यवाही याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. प्रत्येक कार्यकर्त्याचा सक्रिय सहभाग आणि प्रभावी समन्वय हीच विजयाची गुरुकिल्ली असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.

या बैठकीला पुणे पदवीधर मतदारसंघाच्या भाजपा-महायुतीच्या उमेदवार स्मिताताई जाधव, शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार कौस्तुभ गावडे, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, आमदार निरंजन डावखरे, गोपीचंद पडळकर, सत्यजीत देशमुख, प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, शरद लाड, जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, शहराध्यक्ष प्रकाश ढंग, वर्षाताई डहाळे यांच्यासह सांगली जिल्ह्यातील भाजपाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.