पुणे पदवीधर व शिक्षक निवडणूक: प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपची उच्चस्तरीय आढावा बैठक; विजयासाठी सूक्ष्म नियोजनावर भर
पुणे, १० ऑक्टोबर : पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज पुणे येथे भारतीय जनता पार्टीची अत्यंत महत्त्वपूर्ण आणि उच्चस्तरीय आढावा बैठक संपन्न झाली. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली आणि राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पुणे ग्रामीण, पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवडमधील सर्व प्रमुख पदाधिकारी व लोकप्रतिनिधींची ही नियोजन बैठक पार पडली.
या बैठकीत आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार नोंदणी मोहीम तीव्र करणे, बूथनिहाय सूक्ष्म नियोजन करणे आणि प्रचार यंत्रणा अधिक प्रभावीपणे राबवणे यांबाबत प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांना महत्त्वपूर्ण व मार्गदर्शक सूचना केल्या. पदवीधर आणि शिक्षक महायुतीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील, अशा रीतीने प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
शहर, ग्रामीण आणि पिंपरी-चिंचवडचे कार्यकर्ते सज्ज
निवडणुकीच्या अनुषंगाने पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि पुणे ग्रामीणच्या संघटनात्मक बांधणीचा सविस्तर आढावा या बैठकीत घेण्यात आला. प्रदेशाध्यक्षांच्या मार्गदर्शनामुळे आगामी निवडणुकीच्या प्रचाराला आता अधिक गती मिळणार असून, महायुतीचे उमेदवार विक्रमी मताधिक्याने विजयी करण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि समर्पित कार्यकर्ते पूर्ण ताकदीने सज्ज झाले आहेत, असा विश्वास याप्रसंगी नेत्यांनी व्यक्त केला.
यावेळी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, आमदार निरंजन डावखरे, महापौर मंजुषा नागपुरे, पदवीधरच्या उमेदवार डॉ. स्मिता जाधव, शिक्षकचे उमेदवार कौस्तुभ गावडे, डॉ.प्रशम कोल्हे, प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे पिंपरी चिंचवडचे शत्रुघ्न काटे यांच्यासह भाजपचे सर्व लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी उपस्थित होते.