गणेशोत्सवात डीजे आणि लेझर बीमचा अतिवापर टाळा; मंत्री चंद्रकांत पाटील यांचे पुणेकरांना पत्राद्वारे भावनिक आवाहन

4

पुणे : “पुणेकरांच्या हृदयात भक्तीभाव जागला पाहिजे; छातीत धडकी भरता कामा नये. भक्ती, संस्कृती आणि सामाजिक जाणीव जपत आपण सर्वांनी गणेशोत्सवाची ही गौरवशाली परंपरा पुढे नेली पाहिजे,” असे सांगत राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुणेकरांना एका विशेष पत्राद्वारे शिस्तबद्ध गणेशोत्सव साजरा करण्याचे भावनिक आवाहन केले आहे. गणेशोत्सवाचे पवित्र्य, भक्तीभाव आणि सामाजिक जाणीव जपत नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी या पत्रात नमूद केले आहे.

गेल्या काही वर्षांतील विसर्जन मिरवणुकीतील अतिरेक पाहता, मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विशेषतः डीजे (DJ) आणि लेझर बीमच्या अतिवापरावर बोट ठेवले आहे. कायद्याचा पूर्ण सन्मान राखत, अत्यंत भक्तीमय आणि शिस्तबद्ध पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन त्यांनी केले. उत्सवाचा आनंद अबाधित ठेवताना घरातील ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि रुग्णांना आवाजाच्या प्रदूषणामुळे व लेझरच्या तीव्र प्रकाशामुळे कोणताही त्रास होणार नाही, याची प्रत्येकाने वैयक्तिक व सामाजिक दक्षता घ्यावी, असे त्यांनी पत्रात स्पष्ट केले आहे.

कोरोना महामारीच्या अत्यंत कठीण काळात पुण्याच्या गणेश मंडळांनी समाजहिताला सर्वोच्च प्राधान्य दिले होते आणि दाखवलेली ती संवेदनशीलता संपूर्ण देशासाठी प्रेरणादायी ठरली होती, याची आठवणही त्यांनी करून दिली. त्याच सामाजिक बांधिलकीचे भान ठेवून या वर्षीही गणरायाचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि सुरक्षित वातावरणात साजरा करावा, असे आवाहन त्यांनी केले. संस्कृतीचे रक्षण करत आणि नियमांचे पालन करत पुण्याचा गणेशोत्सव जगभरात आदर्श ठरेल, असा विश्वास त्यांनी पत्राच्या शेवटी व्यक्त केला आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.