ज्येष्ठ लावणीसम्राज्ञी शकुंतलाबाई नगरकर यांच्या निधनाने लोककलेची मोठी हानी; मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली
पुणे : ज्येष्ठ लावणीसम्राज्ञी आणि ‘संगीत नाटक अकादमी’ पुरस्काराने सन्मानित शकुंतलाबाई नगरकर यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आणि धक्कादायक आहे, अशा शब्दांत राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत. शकुंतलाबाई यांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या लोककला आणि सांस्कृतिक क्षेत्राची कधीही भरून न निघणारी मोठी हानी झाली आहे, असे त्यांनी नमूद केले.
शकुंतलाबाई नगरकर यांनी आपल्या असामान्य प्रतिभेने, अथांग समर्पणाने आणि कलेवरील निष्ठेने महाराष्ट्राच्या समृद्ध लावणी परंपरेला एक नवी आणि जागतिक ओळख मिळवून दिली. बैठकीची लावणी, अचूक भावमुद्रा, अजोड अदाकारी आणि नजाकतीचा एक अनोखा व देखणा संगम त्यांच्या सादरीकरणात पाहायला मिळत असे. ‘संगीत बारी’सारख्या अत्यंत लोकप्रिय प्रयोगांच्या माध्यमातून त्यांनी अस्सल, पारंपरिक लावणीची समृद्ध संस्कृती आजच्या नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचे अत्यंत महत्त्वाचे कार्य केले.
“शकुंतलाबाई नगरकर यांच्या पवित्र आत्म्यास ईश्वर सद्गती लाभो आणि त्यांच्या शोकाकुल कुटुंबीय, आप्तस्वकीय व लाखो चाहत्यांना हे अतीव दुःख सहन करण्याचे बळ मिळो, हीच ईश्वरचरणी मनःपूर्वक प्रार्थना,” अशा शब्दांत मंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.