मंत्री चंद्रकांत पाटील यांचा संघ संस्कारांना वंदन; कोथरूड आणि कोल्हापुरात आरएसएसच्या भव्य पथसंचलनात घेतला प्रत्यक्ष सहभाग

11

पुणे / कोल्हापूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) स्थापना दिनानिमित्त व विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर आयोजित विविध कार्यक्रमांमध्ये राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून स्वयंसेवकांचा उत्साह वाढवला. पुणे येथील कोथरूड आणि कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य पथसंचलनात (Route March) त्यांनी सक्रिय सहभाग घेतला.

कोथरूडमध्ये राष्ट्रहिताचा संकल्प अधिक दृढ

पुण्यातील कोथरूडमधील छत्रपती संभाजीनगर परिसरातील परमहंसनगर येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला मंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित होते. “राष्ट्रभक्तीची भावना, शिस्तीचे संस्कार आणि समाजाप्रती समर्पणाचा विचार दृढ करणारी संघाची परंपरा हीच खऱ्या अर्थाने राष्ट्रनिर्मितीची प्रेरणाशक्ती आहे,” असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. तसेच राष्ट्रहित सर्वोच्च मानून कार्य करण्याचा संकल्प या निमित्ताने अधिक दृढ झाल्याचे त्यांनी सांगितले.

कोल्हापुरातील संचलनातून अनुभवली राष्ट्रसेवेची प्रेरणा

कोथरूडसोबतच कोल्हापूर येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापना दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या भव्य पथसंचलनातही मंत्री पाटील सहभागी झाले होते. शिस्तबद्ध पद्धतीने आणि एकाच लयीत पडणारी स्वयंसेवकांची पावले, भगव्या ध्वजाप्रती असलेला आदर आणि मातृभूमीच्या सेवेसाठीचा दृढ संकल्प अनुभवताना मनात एक वेगळीच ऊर्जा व अभिमान जागृत झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

“राष्ट्र प्रथम, राष्ट्रहित सर्वोपरि! या भावनेतून राष्ट्रनिर्माणाच्या या अत्यंत पवित्र कार्यात सहभागी होता आले, याचा मला मनस्वी आनंद आणि अभिमान आहे,” अशा शब्दांत मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आपल्या भावना सोशल मीडियावरून व्यक्त केल्या आहेत. या दोन्ही ठिकाणच्या संचलनात संघाचे पदाधिकारी आणि शेकडो स्वयंसेवक पूर्ण गणवेशात सहभागी झाले होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.