ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या ‘निसर्गछाया’ उपक्रमाचा विस्तार; नव्या १६ खोल्यांचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते लोकार्पण
पुणे : ज्येष्ठ नागरिकांच्या आयुष्यात आपुलकीचा आधार, आनंदाचे क्षण आणि हक्काचे व्यासपीठ निर्माण करणाऱ्या, तसेच महाबळेश्वरसारख्या निसर्गरम्य ठिकाणी पर्यटनाचा आनंद देणाऱ्या ‘निसर्गछाया’ या उपक्रमाचा आता लोकसहभागातून आणखी विस्तार झाला आहे. विजयादशमी अर्थात दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर या वास्तूतील नव्याने बांधण्यात आलेल्या १६ खोल्यांचे भव्य लोकार्पण राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले.
ज्येष्ठांचे जीवन अधिक आनंददायी करण्याचा उद्देश
या प्रसंगी बोलताना मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ‘निसर्गछाया’ उपक्रमाचे भरभरून कौतुक केले. ते म्हणाले, “ज्येष्ठ नागरिकांना प्रेम आणि आपलेपणाची ऊब देणाऱ्या निसर्गछायाच्या इमारतीचा विस्तार होणे ही मनाला आनंद आणि समाधान देणारी बाब आहे. ज्येष्ठांच्या चेहऱ्यावरील हास्य, त्यांच्या मनातील समाधान आणि त्यांना मिळणारा जिव्हाळ्याचा आधार, हीच अशा उपक्रमांची खरी फलश्रुती आहे. आयुष्याच्या उत्तरार्धात त्यांचे जीवन अधिक सुसह्य व आनंददायी व्हावे, हाच या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.”
“निसर्गछायाचा हा सेवावृक्ष असाच निरंतर बहरत राहो आणि त्याच्या मायेच्या छायेत अनेक ज्येष्ठ नागरिकांना आनंदाचे व समाधानाचे क्षण अनुभवता यावेत,” अशा भावना व्यक्त करत मंत्री पाटील यांनी उपक्रमाला भावी वाटचालीसाठी मनापासून सदिच्छा दिल्या.
या देखण्या लोकार्पण सोहळ्याला निसर्गछाया उपक्रमाचे मुख्य संयोजक मंदार देवगावकर, अमृता देवगावकर आणि रवींद्र आचार्य यांच्यासह परिसरातील इतर अनेक मान्यवर, पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.