महाराष्ट्राच्या लोककलेचा जागतिक डंका: संतोष डावखर दिग्दर्शित ‘गोंधळ’ चित्रपटाची ९९व्या ऑस्कर पुरस्कारांसाठी भारताची अधिकृत प्रवेशिका म्हणून निवड…. मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून अभिनंदन व्यक्त

10

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टी आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवासाठी एक अत्यंत अभिमानास्पद आणि ऐतिहासिक बातमी समोर आली आहे. महाराष्ट्राच्या मातीत रुजलेल्या समृद्ध लोकपरंपरेचे दर्शन घडवणाऱ्या आणि संतोष डावखर दिग्दर्शित ‘गोंधळ’ या मराठी चित्रपटाची ९९व्या अकादमी पुरस्कारांसाठी (Oscar Awards) भारताची अधिकृत प्रवेशिका म्हणून निवड झाली आहे. मराठी मातीतली लोकपरंपरा, तिचे सांस्कृतिक वैभव आणि त्यामागची कथा आता जागतिक सिनेमाच्या सर्वोच्च व्यासपीठावर पोहोचत असल्याबद्दल राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आनंद व्यक्त केला आहे.

महाराष्ट्राच्या समृद्ध लोकपरंपरांमध्ये आपल्या संस्कृतीचा आत्मा जपला गेला असून, या मातीतील ‘गोंधळ’ या लोककलेची ओळख आता जगभर पोहोचणार आहे, ही आपल्या सर्वांसाठी गौरवास्पद बाब असल्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी नमूद केले. मराठी चित्रपटसृष्टीच्या इतिहासात ‘श्वास’, ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’ आणि ‘कोर्ट’नंतर ऑस्करच्या प्रवासाला निघालेला ‘गोंधळ’ हा चौथा मराठी चित्रपट ठरला आहे. या ऐतिहासिक कामगिरीमुळे मराठी चित्रपटसृष्टीच्या गौरवशाली वाटचालीत आणखी एक सुवर्ण अध्याय जोडला गेला आहे.

मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या उल्लेखनीय आणि अभूतपूर्व यशाबद्दल दिग्दर्शक संतोष डावखर आणि ‘गोंधळ’ चित्रपटाच्या संपूर्ण टीमचे मनःपूर्वक अभिनंदन केले असून, पुढील ऑस्कर प्रवासासाठी आणि मराठी मातीचा आवाज जागतिक पडद्यावर घुमवण्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.

Get real time updates directly on you device, subscribe now.