मराठी भाषेच्या संवर्धनासाठी ऐतिहासिक पाऊल! पुण्याच्या डेक्कन कॉलेजमध्ये ‘अभिजात मराठी भाषा अध्ययन उत्कृष्टता केंद्र’ स्थापन करण्यास केंद्र सरकारची मंजुरी

5

पुणे : मराठी भाषा, साहित्य आणि समृद्ध ज्ञानपरंपरेच्या संवर्धनासाठी आज एक अत्यंत ऐतिहासिक आणि महत्त्वपूर्ण पाऊल पुढे पडले आहे. पुण्यातील जगप्रसिद्ध डेक्कन कॉलेज पदव्युत्तर आणि संशोधन संस्थेमध्ये ‘अभिजात मराठी भाषा अध्ययन उत्कृष्टता केंद्र’ (Center of Excellence for Classical Marathi) स्थापन करण्यास केंद्र सरकारने अधिकृत मंजुरी दिली आहे. अभिजात मराठी भाषा दिनाच्या पूर्वसंध्येला मिळालेली ही मंजुरी तमाम मराठीजनांसाठी अत्यंत अभिमानाचा आणि आनंदाचा क्षण असल्याची भावना राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली.

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गतिमान नेतृत्वाखाली महाराष्ट्र सरकारने या उत्कृष्टता केंद्राच्या स्थापनेसाठी केंद्र सरकारकडे सातत्याने व यशस्वी पाठपुरावा केला होता. या मंजुरीनंतर आता सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) सादर करून आवश्यक निधी उपलब्ध करून घेण्याची पुढील प्रशासकीय प्रक्रिया वेगाने सुरू होणार आहे.

या अभूतपूर्व आणि महत्त्वपूर्ण निर्णयासाठी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारचे संपूर्ण महाराष्ट्राच्या वतीने मनःपूर्वक आभार मानले आहेत. मराठीच्या हजारो वर्षांच्या समृद्ध वारशाला आधुनिक संशोधनाची भक्कम जोड देत, हा सांस्कृतिक ठेवा भावी पिढ्यांपर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचावा, अशी सदिच्छाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

Get real time updates directly on you device, subscribe now.