योगाच्या माध्यमातून शारीरिक, मानसिक आणि सामाजिक स्वास्थ्याला चालना देतानाच, योग क्षेत्रातील कौशल्यांना व्यावसायिक दिशा देण्याचा हा प्रयत्न निश्चितच महत्त्वपूर्ण – मंत्री चंद्रकांत पाटील

4

पुणे : मानसी प्रेरणा फाउंडेशन आणि नाशिकच्या योग विद्या गुरुकुल यांच्या संयुक्त विद्यमाने संचालित ‘योग निकेतन वेलनेस’ च्या पहिल्या शैक्षणिक सत्रात यश संपादन केलेल्या योग साधकांचा प्रमाणपत्र वितरण समारंभ २ ऑक्टोबर रोजी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला. यावेळी सर्व योग साधकांचे चंद्रकांत पाटील यांनी अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

यावेळी संबोधित करताना पाटील म्हणाले, वंचित वस्तींपर्यंत योगाचा प्रचार-प्रसार पोहोचवतानाच, योग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या युवक-युवतींसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करण्याच्या उद्देशाने ‘योग निकेतन’ ही संकल्पना साकारण्यात आली आहे.

योगाच्या माध्यमातून शारीरिक, मानसिक आणि सामाजिक स्वास्थ्याला चालना देतानाच, योग क्षेत्रातील कौशल्यांना व्यावसायिक दिशा देण्याचा हा प्रयत्न निश्चितच महत्त्वपूर्ण आहे. कोथरूडमध्ये यशस्वी ठरलेले विविध उपक्रम पुढे इतर भागांतही राबविले जात आहेत. ‘योग निकेतन’चा उपक्रमही त्याच दिशेने एक सकारात्मक पाऊल आहे, असे मत पाटील यांनी यावेळी व्यक्त केले.

या प्रसंगी मुग्धा भागवत, ऐश्वर्या जोशी, गंगाधर कुलकर्णी, नगरसेवक पुनीत जोशी, नगरसेविका छाया मारणे, सचिन पाषाणकर, अद्वैत जोशी, अजय मारणे यांच्यासह इतर मान्यवर आणि योग साधक उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.