श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती, साने गुरुजी मित्र मंडळ आणि ‘पुणे फेस्टिव्हल’च्या बाप्पाचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून सपत्नीक दर्शन

16

पुणे : पुण्यनगरीच्या ऐतिहासिक आणि भक्तीमय गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणित करत, राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुण्यातील लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे सपत्नीक दर्शन घेतले. त्यांनी मंदिरात श्रींच्या मूर्तीचे दर्शन घेऊन विधिवत आरती केली. याप्रसंगी आमदार हेमंत रासने आणि उपस्थित सर्व कार्यकर्त्यांशी संवाद साधत त्यांनी सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या व “बाप्पाचा वरदहस्त सर्वांवर सदैव राहो,” अशी प्रार्थना केली.

आपल्या या दर्शन दौऱ्यात पुढे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्या साने गुरुजी मित्र मंडळातील श्री गणरायाचेही सपत्नीक दर्शन घेतले आणि मनोभावे आरती केली. गणरायाच्या या मंगलमूर्ती स्वरूपाचे दर्शन घेताना मनाला विलक्षण समाधान लाभल्याचे सांगत, त्यांनी विघ्नहर्त्या बाप्पाच्या कृपेने प्रत्येकाच्या जीवनात आनंद, आरोग्य, सुख-समृद्धी आणि यश नांदो, असे साकडे श्री गणरायाच्या चरणी घातले. भक्तीच्या रंगात रंगलेली पुण्यनगरी आणि बाप्पाच्या जयघोषाने दुमदुमलेले वातावरण मन प्रसन्न करणारे असल्याचे त्यांनी नमूद केले.

यानंतर, पुण्याच्या गौरवशाली सांस्कृतिक परंपरेचा मानबिंदू असलेल्या ऐतिहासिक ‘पुणे फेस्टिव्हल’मध्ये विराजित श्री गणरायाचे त्यांनी सपत्नीक भावपूर्ण दर्शन घेतले. महोत्सवाच्या ठिकाणी उपस्थित राहून त्यांनी बाप्पाच्या चरणी मनोभावे नतमस्तक होत, सर्व उपस्थितांसह अतिशय भक्तिमय वातावरणात महाआरती केली व सर्व गणेशभक्तांना गणेशोत्सवाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. “कला, संस्कृती आणि भक्तीचा हा अभूतपूर्व संगम असाच उत्तरोत्तर बहरत राहो,” अशी प्रार्थना त्यांनी केली. या प्रसंगी पुणे फेस्टिव्हलचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, जनरल सेक्रेटरी व सांस्कृतिक कार्यक्रमांचे मुख्य संयोजक डॉ. सतीश देसाई आणि पुणे फेस्टिव्हलचे सर्व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.