राज्यातील समाजकार्य महाविद्यालयांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांबाबत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक संपन्न
मुंबई : मंत्रालयात राज्यातील समाजकार्य महाविद्यालयांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांबाबत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. महाराष्ट्र असोसिएशन ऑफ सोशल वर्क एज्युकेटर्स (मास्वे) संघटनेच्या वतीने सादर करण्यात आलेल्या निवेदनातील विविध मागण्यांवर संबंधित अधिकाऱ्यांसोबत मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सविस्तर चर्चा केली.
समाजकार्य शिक्षण क्षेत्राच्या विकासासोबतच या क्षेत्रात कार्यरत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत शासनस्तरावर आवश्यक त्या बाबींचा नियमानुसार अभ्यास करून पुढील कार्यवाही करण्याच्या दृष्टीने बैठकीत विविध मुद्द्यांचा मंत्री पाटील यांनी आढावा घेतला. तसेच, या संदर्भात दर पंधरा दिवसाला आढावा बैठक घेऊन विषय मार्गी लावण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
या बैठकीस उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाचे संचालक तथा तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ. प्रमोद नाईक, उपसचिव अशोक मांडे, प्रताप लुबाळ, अमोल मुत्याल, मास्वे संघटनेचे अध्यक्ष अंबादास मोहिते तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.