पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त देशभरात ‘सेवा संकल्प अभियान’… मोदीजींच्या नेतृत्वात विकसित भारताचा संकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी आपण सर्वजण कटिबद्ध होऊया – मंत्री चंद्रकांत पाटील

5

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त देशभरात ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत आज कोथरुडमध्ये ‘सेवा ज्योत यात्रा’ उत्साहात पार पडली. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा स्मारक येथून निघालेल्या ‘शिवज्योत यात्रे’चा समारोप डी.पी. रोडवरील शुभारंभ लॉन्स येथे उत्साहपूर्ण वातावरणात झाला. देशाचे पंतप्रधान आदरणीय मा.श्री. नरेंद्रजी मोदी यांनी सरकारप्रमुख म्हणून अखंड २५ वर्षे पूर्ण केल्याच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीवर नवी दिल्ली येथे आयोजित ‘विकसित भारत संकल्प सभे’तील त्यांचे प्रेरणादायी संबोधन याच ठिकाणी सर्वांसमवेत ऐकले. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची प्रमुख उपस्थिती होती. कोथरुडकरांनी मोठ्या उत्साहाने आणि आपुलकीने या यात्रेत सहभागी होत सेवा, समर्पण आणि राष्ट्रभक्तीचा संकल्प अधिक दृढ केला.

सेवा संकल्प अभियानांतर्गत आज देशाचे लोकप्रिय मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी देशवासीयांना संबोधित केले. विकसित भारताच्या संकल्पाची दिशा स्पष्ट करताना मोदीजींनी दिलेला ‘We Will Do It’ हा मंत्र प्रत्येक भारतीयामध्ये आत्मविश्वास आणि नव्या संकल्पाची ऊर्जा निर्माण करणारा आहे, असे मत मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले. मोदीजींचे विचार, त्यांची दूरदृष्टी आणि विकसित भारतासाठीचा दृढ संकल्प निश्चितच प्रेरणादायी आहे. त्यांच्या मार्गदर्शनातून देशाला नवी दिशा आणि नवी ऊर्जा मिळते. मोदीजींच्या नेतृत्वात विकसित भारताचा संकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी आपण सर्वजण कटिबद्ध होऊया, असे पाटील यावेळी म्हणाले.

७ ऑक्टोबर २००१ रोजी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून सुरू झालेल्या जबाबदारीच्या प्रवासाला आज २५ वर्षे पूर्ण झाली. या प्रदीर्घ प्रवासाचे श्रेय स्वतःकडे न घेता देशातील जनतेच्या विश्वासाला देत मा. मोदीजींनी देशवासीयांसमोर नतमस्तक होत कृतज्ञता व्यक्त केली. “आज मी जे काही आहे, जिथे आहे, त्यामध्ये जनता-जनार्दनाचे सर्वांत मोठे योगदान आहे,” ही त्यांनी व्यक्त केलेली भावना त्यांच्या संबोधनाचा केंद्रबिंदू होती. जनतेचा विश्वास आणि लाखो कार्यकर्त्यांचे परिश्रम हीच आपली सर्वांत मोठी शक्ती असल्याचेही मोदीजींनी सांगितले.

या २५ वर्षांच्या प्रवासाकडे व्यक्तिगत गौरव म्हणून नव्हे, तर राष्ट्रसेवेचे मिशन म्हणून पाहत असल्याचे मा. मोदीजींनी अधोरेखित केले. “मी महत्त्वाकांक्षेसाठी नव्हे, तर मिशनसाठी जगणारा माणूस आहे. कर्म हीच माझ्यासाठी साधना आहे आणि हे कर्म देशासाठी, देशवासीयांसाठी आहे,” या भावनेतून त्यांनी आपल्या कार्यप्रवासामागील प्रेरणा मांडली. देशाचा विषय येतो तेव्हा पद, प्रतिष्ठा आणि अधिकारापेक्षा राष्ट्रहित सर्वोच्च असल्याचा विचारही त्यांनी ठामपणे मांडला.
या प्रवासातील प्रत्येक अनुभवाने काही ना काही शिकवल्याचे सांगताना समर्थकांनी उत्साह दिला, टीकाकारांनी आत्मपरीक्षण करायला शिकवलं आणि विरोध करणाऱ्यांनी लोकशाहीची ताकद समजावून दिली, अशी भावना मा. मोदीजींनी व्यक्त केली. भारताची लोकशाही आणि संविधानाप्रती कृतज्ञता व्यक्त करत त्यांनी देशभरातील ‘सेवा ज्योती यात्रा’मध्ये सहभागी झालेल्या नागरिकांचेही अभिनंदन केले.

मोदीजींच्या संबोधनात पुढील भारताचा रोडमॅपही स्पष्टपणे प्रतिबिंबित झाला. आत्मनिर्भर भारत, भारताला जगातील आघाडीच्या तीन अर्थव्यवस्थांमध्ये स्थान मिळवून देणे, उत्पादन क्षेत्राचा अधिक विस्तार, भारताला जागतिक मॅन्युफॅक्चरिंग हब बनवणे, अंतराळ क्षेत्रात नवी शिखरे गाठणे आणि भविष्यात ऑलिम्पिकचे यजमानपद भूषविण्यासाठी भारताला सज्ज करणे अशा विविध ध्येयांचा उल्लेख करत त्यांनी २०४७ पर्यंत विकसित भारताच्या निर्मितीसाठी नव्या ऊर्जेने काम करण्याचे आवाहन केले. या संकल्पासाठी त्यांनी दिलेला संदेश स्पष्ट होता… We Will Do It!

२५ वर्षांचा हा टप्पा केवळ एका प्रदीर्घ नेतृत्वप्रवासाचा आलेख नाही; तर ‘राष्ट्र प्रथम, नागरिक प्रथम’ या भूमिकेतून सुरू असलेल्या सेवायात्रेतील एक महत्त्वाचा क्षण आहे. सेवा, सुशासन, विकास आणि आत्मनिर्भरतेच्या संकल्पातून २०४७ च्या विकसित भारतासाठी अधिक वेगाने आणि अधिक ऊर्जेने कार्य करण्याची प्रेरणा आजच्या या संबोधनातून मिळाली, असे मत केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केले.

यावेळी माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, भाजपा पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे, आमदार भीमरावअण्णा तापकीर, आमदार सिद्धार्थ शिरोळे, आमदार सुनील कांबळे यांच्यासह भारतीय जनता पार्टी पुणे शहरचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.