‘काऊन्सिल ऑफ एज्युकेशन सोसायटी’च्या मुलींच्या वसतिगृहाच्या नवनिर्मित तिसऱ्या मजल्याचा लोकार्पण सोहळा मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न
कोल्हापूर : कोल्हापूर येथील क्रीडा संकुल रोडवरील देशभक्त रत्नाप्पा कुंभार स्थापित ‘काऊन्सिल ऑफ एज्युकेशन सोसायटी’च्या मुलींच्या वसतिगृहाच्या नवनिर्मित तिसऱ्या मजल्याचा लोकार्पण सोहळा राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत अतिशय उत्साहात संपन्न झाला. लोकसहभागातून साकारलेल्या या विस्तारित वास्तूमुळे ग्रामीण भागातून शिक्षणासाठी येणाऱ्या अधिकाधिक विद्यार्थिनींची निवास व्यवस्था अधिक सुकर होणार आहे.

ग्रामीण भागातून कोल्हापुरात उच्च शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थिनींची निवास व्यवस्था या वसतिगृहात करण्यात आली आहे. मात्र, विद्यार्थिनींच्या वाढत्या संख्येमुळे उपलब्ध खोल्यांची संख्या अपुरी पडत होती. ही निकड लक्षात घेऊन लोकसहभागातून वसतिगृहाच्या तिसऱ्या मजल्याचे बांधकाम पूर्ण करण्याची ग्वाही देण्यात आली होती. त्यानुसार हे बांधकाम विहित वेळेत पूर्णत्वास नेण्यात आल्याने विद्यार्थिनींची मोठी सोय झाली आहे.
या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी संस्थेच्या अध्यक्षा रजनीताई मगदूम, प्रसाद मगदूम, डॉ. विश्वनाथ मगदूम, ॲड. वैभव पेडणेकर यांच्यासह शिक्षण क्षेत्रातील इतर मान्यवर, संस्थेचे पदाधिकारी आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.