बार्शीत शिक्षक व पदवीधरांचा महायुतीला पाठिंबा; मंत्री चंद्रकांत पाटील यांनी साधला संवाद

6

सोलापूर : पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथे राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विशेष दौरा केला. या दौऱ्यादरम्यान त्यांनी बार्शीतील यशोदा शिक्षण प्रसारक मंडळ आणि राजीव स्मृती बहुद्देशीय संस्थेतील सन्माननीय शिक्षक व पदवीधर मतदारांशी थेट संवाद साधला. याप्रसंगी त्यांनी शिक्षण क्षेत्रातील विविध प्रश्न, अडचणी आणि शिक्षकांच्या अपेक्षा जाणून घेतल्या.

संवाद बैठकीत मार्गदर्शन करताना मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भाजप-महायुतीच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले. पुणे पदवीधर मतदारसंघाच्या अधिकृत उमेदवार डॉ. स्मिता जाधव आणि शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार कौस्तुभ गावडे यांच्या पाठीशी मतदारांनी खंबीरपणे उभे राहावे. ही निवडणूक प्राधान्यक्रमाने होत असल्याने दोघांनाही प्रथम पसंतीचे (१) मत देऊन प्रचंड मताधिक्याने विजयी करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

या महत्त्वपूर्ण संवाद सोहळ्याला राज्य मंत्रिमंडळातील मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे, बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत आणि माजी आमदार नारायणआबा पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. या नेत्यांनीही महायुतीच्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी बार्शी तालुक्यातून जास्तीत जास्त मतदान करून घेण्याचा निर्धार व्यक्त केला.

याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष अरुण बारबोले, ज्येष्ठ पत्रकार राजाभाऊ माने, विनायक गरड, मोहन डांगरे यांच्यासह दोन्ही संस्थांचे सर्व पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि पदवीधर मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.