पुणे पदवीधर निवडणूक: सोलापूर आणि बार्शीत महायुतीचे भव्य पदवीधर मेळावे; मंत्री चंद्रकांत पाटील यांचे उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन

6

सोलापूर : पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्हा दौऱ्यावर असलेल्या उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोलापूर शहर आणि बार्शी येथे आयोजित भव्य पदवीधर मेळाव्यांना संबोधित केले. याप्रसंगी पदवीधर मतदारांशी थेट संवाद साधत त्यांनी भाजप-महायुतीचे अधिकृत उमेदवार डॉ. स्मिता जाधव (पदवीधर) आणि कौस्तुभ गावडे (शिक्षक) यांना पहिल्या पसंतीचे मत देऊन विजयी करण्याचे आवाहन केले.

अनुभवाच्या बळावर प्रश्न सोडवणार: चंद्रकांत पाटील

सोलापूर येथील मेळाव्यात मतदारांना मार्गदर्शन करताना मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आपल्या लोकप्रतिनिधीत्वाच्या आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले, “२००९ आणि २०१४ मध्ये पुणे पदवीधर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करताना मला पदवीधरांच्या विविध प्रश्नांवर प्रत्यक्ष काम करण्याची संधी मिळाली. याशिवाय, राज्याचा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री म्हणूनही शिक्षण क्षेत्रातील अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी मी प्रयत्न केले आहेत. याच प्रदीर्घ अनुभवाच्या बळावर महायुतीचे दोन्ही उमेदवार पदवीधर आणि शिक्षकांच्या अपेक्षांना पूर्ण न्याय देतील.

बार्शीत मतदान प्रक्रियेबाबत विशेष मार्गदर्शन

सोलापूर शहरासोबतच बार्शी येथेही महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहीर पदवीधर मेळावा पार पडला. या मेळाव्यात मंत्री पाटील यांनी पदवीधरांना या निवडणुकीच्या गुंतागुंतीच्या मतदान प्रक्रियेविषयी (Preference Voting) सविस्तर व तांत्रिक मार्गदर्शन केले. सुशिक्षित मतदारांनी मतदानाचा हक्क अचूकपणे बजावून लोकशाही बळकट करावी, असे आवाहन त्यांनी केले.

या संपूर्ण दौऱ्या दरम्यान आणि दोन्ही मेळाव्याप्रसंगी राज्य मंत्रिमंडळातील मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे, बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत, माजी आमदार नारायणआबा पाटील आणि भाजप शहराध्यक्षा रोहिणीताई तडवळकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

याशिवाय माजी आमदार दिलीप माने, प्रदेश प्रमुख विक्रम देशमुख, जिल्हा परिषद अध्यक्ष इंद्रजीत पवार, यशोदा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अरुण बारबोले, ज्येष्ठ पत्रकार राजाभाऊ माने, विनायक गरड, मोहन डांगरे, जिल्हा परिषद सदस्य डॉ. पृथ्वीराज माने, नरेंद्र काळे आणि रंजिता चकोते यांच्यासह सोलापूर जिल्ह्यातील विविध लोकप्रतिनिधी, दोन्ही संस्थांचे पदाधिकारी, भाजप-महायुतीचे आजी-माजी नेते आणि पदवीधर व शिक्षक मतदार प्रचंड संख्येने उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.