राष्ट्रपती पुरस्कार विजेते शिक्षक सागर बगाडे यांच्या सेवापूर्ती सोहळ्यास मंत्री चंद्रकांत पाटील यांची उपस्थिती; ‘अथांग… एका मास्तराची चित्तरकथा’ ग्रंथाचे प्रकाशन
कोल्हापूर, २२ नोव्हेंबर २६ : राष्ट्रपती पुरस्कार विजेते शिक्षक सागर चित्तरंजन बगाडे यांच्या ३० वर्षांच्या प्रदीर्घ शैक्षणिक सेवापूर्तीनिमित्त कोल्हापूर येथे आयोजित सेवापूर्ती कृतज्ञता सोहळ्यास राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित राहून त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी बगाडे यांच्या कारकिर्दीचा वेध घेणाऱ्या ‘अथांग… एका मास्तराची चित्तरकथा’ या महागौरव ग्रंथाचे प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी बोलताना मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सागर बगाडे यांच्या कार्याचा गौरव केला. अध्यापनाच्या माध्यमातून नवी पिढी घडवतानाच बगाडे यांनी सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातही मोलाचे योगदान दिले असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यांच्या ३० वर्षांच्या कारकिर्दीतील संघर्ष, विचार आणि सुवर्ण आठवणींचा वेध घेणारा हा महागौरव ग्रंथ सर्वांसाठी प्रेरणादायी ठरेल, असा विश्वासही पाटील यांनी व्यक्त केला.
या सेवापूर्ती कृतज्ञता सोहळ्यास स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, खासदार धनंजय महाडिक, आमदार कौस्तुभ शुभांगी मुरलीधर गावडे यांच्यासह शिक्षण, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.