पुणे विभाग निवडणूक: कोल्हापुरात श्री वसंतराव देशमुख हायस्कूलच्या शिक्षकांचा महायुतीला विजयी करण्याचा संकल्प; मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी विशेष संवाद
कोल्हापूर, १७ ऑक्टोबर : पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज कोल्हापूर येथील श्री लक्ष्मी शिक्षण प्रसारक मंडळ संचालित श्री वसंतराव जयंतराव देशमुख हायस्कूलला भेट दिली. याप्रसंगी त्यांनी शाळेतील सन्माननीय शिक्षकांशी विशेष संवाद साधत महायुतीच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले.
प्राधान्यक्रमाच्या मतदानाबाबत मार्गदर्शन आणि आवाहन
भाजपा-महायुतीकडून पुणे पदवीधर मतदारसंघातून डॉ. स्मिता जाधव आणि शिक्षक मतदारसंघातून कौस्तुभ गावडे हे अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत. ही निवडणूक प्राधान्यक्रमाने (Preference Voting) होत असल्याने, मतदारांनी पहिल्या पसंतीचे मत देऊन महायुतीच्या दोन्ही उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करावे, असे आवाहन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.
संस्थेचा महायुतीला पाठिंबा; मानले आभार
या बैठकीदरम्यान श्री लक्ष्मी शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने निवडणूक रिंगणात असलेल्या महायुतीच्या दोन्ही उमेदवारांनाच विजयी करण्याचा अधिकृत संकल्प व्यक्त करण्यात आला. शिक्षण क्षेत्रातील प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी महायुती सरकारने घेतलेल्या निर्णयांवर विश्वास ठेवत संस्थेने दिलेल्या या खंबीर पाठिंब्याबद्दल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी संस्थेचे विशेष आभार मानले.
या विशेष संवाद सोहळ्याप्रसंगी शिवसेना गटनेते व माजी नगरसेवक सारंगधर देशमुख, संस्थेच्या अध्यक्षा सुमन देशमुख, भाजपचे ज्येष्ठ नेते राहुल चिकोडे यांच्यासह संस्थेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.