सुप्रसिद्ध अभिनेता इरफान खानचे निधन

लाईफ ऑफ पाय, बिल्लू, हिंदी मिडीयम, पिकू, पानसिंग तोमर अशा एकापेक्षा एक चित्रपटात दर्जेदार अभिनयाने आपल्या भूमिकांना वेगळा आयाम देणारा हरहुन्नरी बॉलिवूड अभिनेता इरफान खान याचं निधन झाल्याची दु:खद बातमी समोर आली आहे. वयाच्या अवघ्या 53 व्या वर्षी इरफानने अखेरच्या श्वास घेतला. प्रकृती बिघडल्याने काल त्याला मुंबईच्या कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, तिथेच उपचारादरम्यान इरफानची प्राणज्योत मालवली. दोन वर्षांपासून तो न्यूरोएन्डोक्राइन ट्यूमरने त्रस्त होता.
मार्च 2018 मध्ये इरफानला कॅन्सर झाल्याचं स्पष्ट झालं होतं. त्याने स्वतः ही धक्कादायक बातमी दिली होती. ‘आयुष्यात अचानक काही अशा घटना होतात ज्यामुळे आयुष्य तुम्हाला खूप पुढे घेऊन जातं. माझ्या आयुष्यात मागील काही दिवसांपासून असंच काहीसं घडत आहे. मला न्यूरो एन्डोक्राईन ट्यूमर नावाचा आजार झाला आहे. मात्र, आजूबाजूच्या लोकांच्या प्रेमाने आणि शक्तीने मला नवी आशा मिळाली आहे’ असं ट्विट त्याने त्यावेळी केलं होतं.