अहमदनगर रुग्णालय आग प्रकरणात, वैद्यकिय अधिकाऱ्यासह 4 जणांना अटक

7

अहमदनगर: अहमदनगरमधील जिल्हा रूग्णालयाला लागलेल्या भीषण आगीत 11 जणांचा होरपळून मृत्यू झाला होता. या प्रकरणी आरोग्य विभागाने कठोर कारवाई केली असून चार जणांना अटक करण्यात आली आहे. अटक झालेल्यांमध्ये एक वैद्यकीय अधिकारी आणि 3 परिचारिकांचा समावेश आहे. वैद्यकिय अधिकारी विशाखा शिंदे, परिचारिका सपना पठारे, आस्मा शेख आणि चन्ना अंनत अशी अटक करण्यात आलेल्यांची नावं आहेत. विशाखा शिंदे आणि सपना पठारे यांचं निलंबन केलं होतं, तर अस्मा शेख आणि चन्ना अनंत यांची सेवा समाप्त केली होती.

गेल्या आठवड्यात जिल्हा रुग्णालयातील करोना अतिदक्षता विभागात आग लागली होती. त्यामध्ये ११ जणांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी स्वत: गुन्हा दाखल केला होता. अज्ञात आरोपींविरूदध हा गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला. त्यानंतर नाशिक परिक्षेत्राचे पोलिस उपमहानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर यांनी कालच नगरला भेट देऊन सखोल चौकशी केली होती. मधल्या काळात आरोग्य विभागाकडूनही मिळालेल्या माहितीच्या आधारे कर्मचाऱ्यांवर कारवाई झाली. पोलिसांनी संकलित केलेल्या पुराव्यात नावे निष्पन्न झाल्याने मंगळवारी सायंकाळी यातील चौघांना अटक करण्यात आली. जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांच्या देखरेखीखाली पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके या घटनेचा तपास करीत आहेत.

पोलिसांनी घटनास्थळावरून सीसीटीव्ही फुटेज हस्तगत गेले होते. त्याची पडताळणी यासोबत अधिकारी, कर्मचाऱ्यांचे जबाब, मृत आणि रुग्णांच्या नातेवाईकांचे जबाब नोंदवून घेण्यात आले. त्यातून नावे निष्पन्न करण्यात आल्याचे सांगण्यात आले. निलंबनाच्या कारवाई विरोधात परिचारिका संघटनेतर्फे सकाळीच आंदोलन करण्यात आले होते. ही कारवाई अन्यायकारक असल्याचे सांगत ती मागे घेण्याची मागणी करण्यात आली. त्यानंतर आता कर्मचाऱ्यांना अटक झाल्याने संघटनेने यावर संताप व्यक्त केला आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.