करुणा धनंजय मुंडे यांच्याकडून नव्या पक्षाची घोषणा; परळीमध्ये निवडणूक लढवणार

24

अहमदनगर: महाराष्ट्रात आणखी एका प्रादेशिक पक्षाची स्थापना झाली आहे. संबंधित नव्या पक्षाची घोषणा करुणा धनजंय मुंडे/शर्मा यांनी केली आहे. शिवशक्ती सेना असं त्या पक्षाचे नाव आहे. शिवशक्ती सेना पक्षाची घोषणा करुणा यांनी गुरुवारी (23 डिसेंबर) रोजी केली. त्याचबरोबर महाराष्ट्र  भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठी हा पक्ष काम करणार आहे. तसेच हा पक्ष महाराष्ट्रातील सर्व निवडणुका लढवणार असल्याचीही घोषणा त्यांनी यावेळी केली.

नव्या पक्षाची घोषणा करताना करुणा मुंडे म्हणाल्या की, ‘महाराष्ट्रामध्ये हजारो कोटींचे घोटाळे होतात. घोटाळ्यामुळे अनेक परीक्षा रद्द झाल्या आहेत. पक्षात येण्यापासून निवडणूक लढवणे आणि मंत्री होईपर्यंत कोट्यावधी रुपये दिल्याशिवाय पदे मिळत नाहीत. एक-एक मंत्री दीड ते 2 हजार कोटींचे घोटाळे करतो. हा सर्व भ्रष्टाचार संपवायचाय. त्यासाठी माझा पक्ष काम करेल. भ्रष्टाचार मंत्री करतात आणि अधिकारी, पोलीस अधिकारी बळी दिले जातात, हे मी 25 वर्ष पाहिलेले आहे. त्यामुळे आता हे संपवायचे आहे.

पुढे बोलताना त्या म्हणाल्या, ’30 जानेवारी रोजी अहमदनगर मध्ये एक मोठा मेळावा होईल. त्या मेळाव्यामध्ये पक्षाचे चिन्ह, पक्षाचा झेंडा, बोधचिन्ह आणि निवडणूक लढवण्या संदर्भातली आचारसंहिता जाहीर केली जाणार आहे. भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्र करणार हे माझे स्वप्न आहे. त्यामुळे या क्षेत्रात काम करणारे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेण्याची माझी इच्छा होती. अनेक वेळा त्यांच्याशी संपर्क केला, मात्र त्यांनी भेटीची वेळ दिली नाही. राळेगणसिद्धी येथे सुद्धा त्यांच्या घराबाहेर 2 तास प्रतीक्षा करत थांबले होते. परंतु मला भेट मिळाली नाही, याची खंत वाटते. असं त्या म्हणाल्या. दरम्यान, निवडणूक लढवण्याची वेळ आली तरी परळीमध्येच निवडणूक लढवणार असल्याची घोषणा देखील त्यांनी केलीय.

Get real time updates directly on you device, subscribe now.