ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंचा एसटी संपाला पाठिंबा, म्हणाले….

अहमदनगर: राज्य परिवहन महामंडळाचे राज्य शासनात विलगीकरण करण्यात यावे या मागणीसाठी गेल्या अनेक दिवसांपासून एसटीचे कर्मचारी संपावर आहेत. तसेच कर्मचाऱ्यांकडून सरकार विरोधात आंदोलन सुरू आहेत. या संपाला ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पाठिंबा देत कर्मचारी आणि नागरिकांनाही सरकारवर दबाव वाढविण्याचा सल्ला दिला आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या एका शिष्टमंडळाने राळेगणसिद्धी येथे जाऊन हजारे यांची भेट घेतली.

हजारे प्रत्यक्षात आंदोलनात सहभागी होणार नसले तरी आंदोलन तीव्र करण्यासंबंधी काही सूचना त्यांनी शिष्टमंडळाला केल्या आहेत. एसटी कर्मचाऱ्यांच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलण्याची तयारीही हजारे यांनी दर्शविली आहे.

एसटी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाने हजारे यांची भेट घेऊन त्यांना मागण्यांचे निवेदन देत, त्यावर चर्चा केली. ती ऐकून घेतल्यानंतर हजारे म्हणाले, सरकार आणि आंदोलनकर्ते यांनी एकमेकांचा विचार केला पाहिजे. मात्र, ३८ एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या करूनही जर सरकारला जाग येत नसेल तर सरकारवर दबाव आणण्याशिवाय पर्याय नाही. यासाठी लाखो नागरिकांनी एकाचवेळी बाहेर पडले पाहिजे. दबाव आल्याशिवाय आणि सरकार पडू शकते, असे वाटल्याशिवाय कोणतेही सरकार हालत नाही.

मात्र, कर्मचाऱ्यांनी हे आंदोलन शांततेच्या आणि असंहिसेच्या मार्गाने केले पाहिजे. कोणत्याही सार्वजनिक मालमत्तेची यामध्ये हानी होता कामा नये, असेही हजारे यांनी कर्मचाऱ्यांना बजावले. यावेळी एसटी कर्मचारी संघटनेचे आबा भोंडवे, सचिन थोरात, सुरेश औटी, गणेश चौधरी, मच्छिंद्र शिंदे, संदीप शिंदे, बापू शिंदे, अरुण मोकाते, नितीन सुरवसे, स्वरूपा वैद्य, कल्पना नगरे, सविता शिंदे उपस्थित होते.