फटाका बॉम्ब फोडण्यापेक्षा शेतकऱ्यांसाठी एखादा अनुदानाचा बॉम्ब फोडा; विखेंचा मलिकांवर निशाणा

अहमदनगर: महाविकास आघाडीतील एक नेता सकाळी झोपेतून उठण्यापूर्वी टीव्हीवर हजर असतो. तो खूर्चीवरून उठत नाही. खूर्चीमध्ये झोपी जातो की काय असे वाटते. रात्री टीव्ही सुरू केला तरीही ते तिथेच बसून असतो. आता यावरून घरात भांडणे सुरू व्हायला लागली आहेत. फटाका बॉम्ब फोडण्यापेक्षा शेतकऱ्यांसाठी एखादा अनुदानाचा बॉम्ब फोडा अशी टीका विखे यांनी मलिक यांचे नाव न घेता केली आहे. ते पाथर्डीमध्ये आयोजित एका कार्यक्रमामध्ये बोलत होते.

भाजपा खासदार सुजय विखे पाटील यांनी मंत्री नवाब मलिक यांना टोला लगावताना, महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली. स्वतःचा नाकर्तेपणा झाकण्यासाठी राज्य सरकारमधील मंत्री उठसूट टीव्हीवर येत आहेत. सध्या महाराष्ट्रात जे काही चालू आहे ते पाहाता, हायकोर्टात याचिका दाखल करून राज्यातील सात-आठ लोकांना प्रसार माध्यमांसमोर न येऊ देण्याची मागणी केली पाहिजे, असे यावेळी विखे यांनी म्हटले आहे.

पुठे बोलताना ते म्हणाले की, टीव्हीवर वारंवार येणाऱ्या या मंत्र्यांना शेतीत काय पिकते, त्याचे दर काय आहेत? हे माहित नाही. मात्र सध्या बाजारात गांजा काय भावाने मिळतो ते त्यांना बरोबर माहित आहे. भाजप कार्यकर्त्यांच्या घरी छापा मारला तर कांदा, सोयाबिन,तूर आणि इतर पिके सापडतील. मात्र यांच्या घरी छापा मारला तर गांजा सापडतो, अशा शद्बात विखे यांनी मलिकांवर निशाणा साधला आहे.