मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवरील शस्त्रक्रिया यशस्वी; डॉक्टरांची माहिती

मुंबई: मानेच्या दुखण्यावरील उपचारासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बुधवारी एच. एन. रिलायन्स रुग्णालयात  दाखल होते. आज त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून मुख्यमंत्री ठाकरेंवरील शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. हाती आलेल्या वृत्तानुसार, सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास मुख्यमंत्र्यांवरील शस्त्रक्रिया सुरू झाली होती. तासभर ही शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. तर आठवडाभराच्या विश्रांतीनंतर पुढच्या आठवड्यात उद्धव ठाकरेंची फिजिओथेरेपी सुरू होणार असल्याचेही डॉक्टरांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांनी आपल्या प्रकृतीसंदर्भात एक निवेदन प्रसिद्ध केले होते. “गेल्या सुमारे दोन वर्षांपासून कोरोनाचा मुकाबला करत आहोत. एकीकडे या विषाणूशी लढाई सुरू असताना दुसरीकडे आपले जीवनचक्र सुरू राहावे, राज्यातली विकासकामे सुरूच राहावीत, म्हणून आम्ही सगळे कुठेही न थांबता सातत्याने प्रयत्न करतोय.

मानदेखील वर करायला वेळ मिळत नव्हता, साहजिकच माझ्या मानेच्या दुखण्याकडे नाही म्हणलं तरी थोडंसं दुर्लक्ष झाले आणि मानेवर जो परिणाम व्हायचा तो झालाच. त्यामुळे या दुखण्यावर व्यवस्थित उपचार व्हावेत, या दृष्टीने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रुग्णालयात दाखल होत असून दोन-तीन दिवस तिथेच राहून योग्य ते उपचार घेणार आहे. आपले आशीर्वाद पाठीशी आहेत, त्यामुळे लवकरच तब्येत बरी होईल”, अशी खात्री असल्याचे मुख्यमंत्र्यांनी निवदेनात नमूद केले होते.

दरम्यान यंदादेखील हिवाळी अधिवेशन मुंबईतच होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी देखील नागपूर येथे होणारे हिवाळी अधिवेशन मुंबईत घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यंदा देखील देशात आणि राज्यात अजूनही कोरोनाचे संकट पूर्णपणे संपलेले नाही. सोबतच मुख्यमंत्र्यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे नागपूरऐवजी हिवाळी अधिवेशन मुंबईतच घेतले जाईल असं सांगितलं जात आहे.  महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपुरात 7 डिसेंबरपासून प्रस्तावित आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

error: Content is protected !!