आपण करू ते तत्वज्ञान अन् दुसरे करतील तो घोडेबाजार; चंद्रकांत पाटलांची काँग्रेसवर टीका
मुंबई: राज्यातील विधान परिषदेच्या सहा जागांपैकी चार जागा बिनविरोध झाल्यानंतर नागपूर आणि अकोला-वाशिम-बुलडाणा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात निवडणुकीच्या निकालाकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. दोन्हा जागांवरील निकाल लागले असून, नागपूर, अकोल्यात भाजपनं विजयाचा गुलाल उधळला आहे. तर अकोल्यात शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे.
या विजयाचा आनंद भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रांत पाटील यांना पेढा भरवून साजरा करण्यात आला. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये पाटील यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली. आपण करू ते तत्वज्ञान आणि दुसरे करतील तो घोडेबाजार, अशी काँग्रेसची दुटप्पी भूमिका आहे. विदाऊट मोदी या देशाचा विकास होणार नाही, हे लोकांना समजले आहे. विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक गुप्त पद्धतीने घ्या, मग तुम्हाला समजेल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
चंद्रकांत पाटील म्हणाले, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दोन जागांच्या निवडणुका झाल्या. मात्र, काँग्रेसने शब्द देऊनही तो पाळला नाही. त्यामुळे निवडणूक झाली. चंद्रशेखर बावनकुळे खूप मोठ्या फरकाने विजयी झाले. दोन्ही विजेत्यांचे अभिनंदन करतो. शिर्डीच्या साईबाबाचे वाक्य आहे. श्रद्धा आणि सबुरी. याचा आम्हाला फायदा झाला. काँग्रेसने या निवडणुकीत पोरखेळ केला, अशी टीका त्यांनी यावेळी केली.
चंद्रकांत पाटील म्हणाले, पटोले आणि केदार यांचा संघर्ष या निवडणुकीत दिसला. विधानसभा अध्यक्ष पदाची गुप्त मतदान पध्दतीने निवडणुकी घ्या, मग तुम्हाला समजेल. विदाऊट मोदी या देशाचा विकास होणार नाही, हे लोकांना समजले आहे. माझे तिकीट कापले म्हणून मी नाराज, असे आमच्या पक्षाने आम्हाला शिकवले नाही, सब्र का फल मिठा होता है, हे सांगायलाही ते विसरले नाहीत. आपण करू ते तत्वज्ञान अन् दुसरे करतील तो घोडेबाजार, अशी काँग्रेसची भूमिका असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.