मी बाळासाहेबांची शपथ घेऊन सांगतो की मी किरीट सोमय्या यांच्यासोबत बोललो नाही – रामदास कदम

मुंबई: शिवसेनेच्या मंत्र्याच्या विरोधात भाजपाच्या नेत्यांना काही पुरावे दिल्याचा आरोपानंतर रामदास कदम यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्याबाबतची एक ऑडिओ क्लिप देखील व्हायरल झाली होती. या क्लिपमधून ते शिवसेना परिवहन मंत्री अनिल परब यांच्याविरोधात कारवाई करत असल्याचे म्हटले जात होते. परब यांचा रिसॉर्ट पाडण्यासाठी कदम हे भाजपा नेते किरीट सोमय्या यांना मदत करत असल्याचे म्हटले जात होते. ही क्लिप व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली होती. त्यावर रामदास कदम यांनी स्पष्टीकरण देताना ही क्लिप आपली नसून कुणाचं तरी हे षडयंत्रं असल्याचं म्हटलं होतं. त्यांनतर पत्रकार परिषद घेत रामदास कदम यांनी अनिल परब यांच्यावर निशाणा साधला आहे.

“माझ्याविरोधात माध्यमांमधून उलट सुलट बातम्या चालवण्यात आल्या. मला आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभे केले आहे आणि ते किती चुकीचे आहे हे स्पष्ट दिसत असल्यानंतर माझी बाजू मांडण्यासाठी मी समोर आलो आहे. जी व्हिडीओ क्लिप व्हायरल झाली होती त्यामध्ये मी शिवसेना पक्षाच्या बाबतीत काहीही बोललेलो नाही.

मी बाळासाहेबांची शपथ घेऊन सांगतो की मी किरीट सोमय्या यांच्यासोबत बोललो नाही. त्यांच्यासोबत कुठलीही चर्चा झालेली नाही. पक्षाला हानी पोहचेल अशी कुठलीही गोष्ट माझ्याकडून घडलेली नाही. मी उद्धव ठाकरेंना पत्र देऊन खुलासा केला होता. दोन नेत्यांमधील वाद चव्हाट्यावर येऊ नयेत म्हणून मी काही पथ्य कालपर्यंत पाळली होती. या पत्रामध्ये मी स्पष्टपणे सगळे नमूद केले आहे,” असे रामदास कदम म्हणाले.

Get real time updates directly on you device, subscribe now.

error: Content is protected !!