महाराष्ट्र विधानसभेला अध्यक्ष मिळू नये ही भाजपची भूमिका – नाना पटोले
मुंबई: विधानसभेला अध्यक्ष मिळू नये, अशी भाजपची भूमिका असल्याचा टोला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी लगावला आहे. मंत्रिमंडळ बैठकीनंतर आता पुन्हा एकदा राज्यपाल भगतसिंह कोशारी पत्र पाठवण्यात आलं असल्याची माहिती नाना पटोले यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे.
काँग्रेस नेत्यांनी रविवारी राज्यपालांची भेट घेतली होती. त्यानंतर त्यांना आज पुन्हा पत्र पाठवण्यात आलं आहे. यावर अजूनतरी राज्यपालांची कोणतीही प्रतिक्रिया आलेली नसल्याचं नाना पटोले यांनी म्हटलंय. दरम्यान, जर राज्यपालांची पत्रावर प्रतिक्रिया आली नाही, तर संविधानिक पद्धतीनं जे काही आम्हाला करता येणं शक्य आहे, ते सगळंकाही आम्ही करु, असंही नाना पटोले यांनी म्हटलंय. त्याचप्रमाणे राज्यपालांच्या आडून विधानसभेला अध्यक्ष मिळू नये, अशी भाजपची भूमिक असल्याचा घणाघाती आरोप नाना पटोले यांनी यावेळी केला.
जे नियम विधानसभा चालवण्यासाठी लागतात, त्यानुसारच विधानसभा अध्यक्षांच्या निवडीसाठी सर्व कार्यवाही केली जात असल्याचा दावा नाना पटोले यांनी केला आहे. दरम्यान, विधीमंडळात केलेल्या नियम घटनाबाह्य असल्याचा आक्षेप राज्यपालांनी नोंदवला होता. मात्र हे नियम कसे बरोबर आहेत, हे त्यांना पटवून देण्याचा पुरेपूर प्रयत्न काँग्रेस नेते आणि महाविकास आघाडी सरकारकडून करण्यात आल्याचंही नाना पटोले यांनी म्हटलं आहे. राज्यपालांनी विधानसभेच्या कामकाजात सरकारला सहकार्य करावी, अशी विनंती देखील नाना पटोले यांनी यावेळी केली.