मालिकेतून काढल्यानंतर किरण माने घेणार शरद पवारांची भेट? चर्चांना उधाण
मुंबई: स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘मुलगी झाली हो’ या मालिकेतील अभिनेते किरण माने हे आपल्या सोशल मीडियावरील परखड मतप्रदर्शनामुळे नेहमीच चर्चेत असतात. याचमुळे त्यांना ‘मुलगी झाली हो’ या मालिकेतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. यावरुन सध्या सोशल मीडिया आणि राजकीय पटलावर आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. अशातच आता अभिनेते किरण माने राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेणार असल्याचे वृत्त आहे.
दरम्यान ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘मुलगी झाली हो’ या लोकप्रिय मालिकेतून अभिनेते किरण माने यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. याबद्दल किरण माने शनिवारी मुंबईतील सिल्व्हर ओक येथे जाऊन शरद पवार यांना भेटणार असल्याचे म्हटले जात आहे. आता शरद पवार या प्रकरणावर प्रतिक्रिया देणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, या सगळ्या वादानंतर ‘मुलगी झाली हो’ मालिकेच्या निर्मात्यांकडूनही स्पष्टीकरण देण्यात आले आहे. किरण माने यांना राजकीय भूमिका घेतल्यामुळे मालिकेतून काढण्यात आलेले नाही. त्यांच्यावर व्यावसायिक कारणांमुळे कारवाई करण्यात आल्याचे मालिकेच्या निर्मात्यांकडून सांगण्यात आले.
एखाद्याला मालिकेतून काढल्यावरुन राजकारण करणे योग्य नाही. ‘स्टार प्रवाह’चे मालक, मालिकेचे दिग्दर्शक किंवा निर्मात्यांचा भाजपचा कोणताही संबंध नाही. त्यामुळे हा ‘स्टार प्रवाह’ स्वतंत्र विषय आहे. किरण माने यांना मालिकेत पुन्हा घेतलं तरी आमची हरकत नाही. काढणं, ठेवणं हा सर्वस्वी ‘स्टार प्रवाह’चा अधिकार आहे, असे भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी सांगितले.