शरद पवार यांचा फुगेवाडी ते पिंपरी-चिंचवड मेट्रोने प्रवास; पुणे मेट्रोच्या कामाचा घेतला आढावा
पुणे: राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज अचानकपणे पुणे मेट्रोतून सफर केला आहे. यावेळी त्यांनी पुणे मेट्रोच्या कामाचा आढावा घेत आणि अधिकाऱ्यांना काही सूचना देखील दिले आहेत. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा मेट्रो कामाच्या पाहणी करण्याचा नियोजित दौरा नव्हता. त्यांनी आज सकाळी ९ ते ९.३० वाजेच्या सुमारास अचानक भेट देऊन मेट्रोच्या कामाचा आढावा घेतला आहे.
यावेळी पवारांनी फुगेवाडी ते पिंपरीतील संत तुकाराम नगरपर्यंत मेट्रोने प्रवास केला. यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे पदाधिकारी होते. तसेच अधिकारीही उपस्थित होते. त्यामुळे मेट्रोच्या डब्यात गर्दी झाली होती. पवारांनी मेट्रोतून उभ्यानेच प्रवास केला. या प्रवासातही त्यांनी अधिकाऱ्यांकडून मेट्रोच्या कामाची माहिती घेतली.
शरद पवारांनी ज्या फुगेवाडी स्थानकातून मेट्रोतून सफर केली. त्या फुगेवाडी स्थानकाचं काम 90 ते 95 टक्के पूर्ण झालं आहे. त्याचीही माहिती पवारांनी घेतली. संत तुकाराम नगर स्टेशनच्या सेफ्टी ऑडिटसाठी दोन महिन्याचा कालावधी अपेक्षित आहे. त्यानंतर पुणे आणि पिंपरी चिंचवडकरांना पिंपरी ते फुगेवाडी हा प्रवास मेट्रोने करता येणार आहे. या मार्गावर नुकतीच चाचणी घेण्यात आली होती.
पुणे मेट्रोच्या वनाज व रेंज हिल्स येथील डेपो उभारण्याचे काम देखील प्रगतीपथावर आहे. पीसीएमसी ते संत तुकारामनगर या 1 किमी मार्गावर पहिली चाचणी घेण्यात आली होती. नववर्षात 3 जानेवारीला बरोबर एक वर्षांनी ही दुसरी चाचणी घेण्यात आली. दुसऱ्या चाचणीसाठी पीसीएमसी ते फुगेवाडी या साधारणतः 6 किमी मार्गावर मेट्रो ट्रेन धावली होती. या महत्वपूर्ण चाचणीसाठी मेट्रोचे कार्यकारी संचालक डी. डी. मिश्रा, मुख्य प्रकल्प अभियंता रवी कुमार, संदीप साकले, श्रीराम मांझी, राजा रमण, रवी टाटा या मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी अथक परिश्रम केले होते. चेतन फडके या ट्रेन ऑपरेटरने चाचणीवेळी ट्रेन चालविली.