राष्ट्रवादी काँग्रेस पाचपैकी तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुका लढवणार – शरद पवार

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पाचपैकी तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुका लढवणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार  यांनी दिली आहे. निवडणूक आयोगाने उत्तर प्रदेशसह उत्तराखंड, मणिपूर, पंजाब आणि गोवा या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. यापैकी मणिपूर, गोवा आणि उत्तर प्रदेशात राष्ट्रवादी कॉंग्रेस निवडणूक लढवणार असल्याची माहिती आज पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

मणिपूरमध्ये राष्ट्रवादीचे चार आमदार होते. या राज्यात राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र मिळून निवडणूक लढवण्यावर चर्चा झाली आहे. तर गोव्यात  काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेससोबत मिळून राष्ट्रवादी निवडणूक लढवण्याबाबत चर्चा सुरू आहे. गोव्यात ज्या जागा लढवायच्या आहेत त्यांची यादी आम्ही काँग्रेस आणि टीएमसीला दिली आहे, असे शरद पवार यांना सांगितले. तसेच उत्तर प्रदेशात आम्ही समाजवादी पक्षासोबत निवडणूक लढवू अशी माहिती देखील शरद पवार यांनी यावेळी दिली. उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्या समाजवादी पक्षाकडून कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला आहे. त्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस देखील सहभागी असणार आहे. तसेच जागावाटपाची चर्चा सुरु असल्याचे शरद पवार म्हणाले.

उत्तर प्रदेशात परिस्थिती खूप बदलताना दिसत आहे, असं वक्तव्य शरद पवार यांनी स्वामी प्रसाद मौर्य यांच्या राजीनाम्यावर बोलताना केलं. उत्तर प्रदेशात बदल होत असल्याचे मी आधीच सांगितले आहे. “राजीनामा दिल्यानंतर समाजवादी पक्षाला पाठिंबा देणार असल्याचे त्यांनी सांगितले. ही सुरुवात आहे. येत्या काही दिवसांत रोज कुठला ना कोणता चेहरा तेथून निघून इकडे येणार आहे”, असे देखील यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले.

Get real time updates directly on you device, subscribe now.

error: Content is protected !!