शिरुर-हवेली-दौंड तालुक्यातील गावांना जोडणारा भीमा नदीवरील पूल उभारणीबाबतची मागणी लवकरात लवकर मार्गी लावण्यात येईल – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

पुणे : राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील पुणे दौऱ्यावर आहेत. त्यांच्या हस्ते जल जीवन अभियानांतर्गत शिरुर तालुक्यातील मौजे विठ्ठलवाडी पाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन आणि इतर १९ गावातील ३२९ कोटी ४५ लाख रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेचे प्रातिनिधिक स्वरूपात उद्धघाटन करण्यात आले.

चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले कि , केंद्र शासन प्रत्येक घराला नळाद्वारे शुद्ध पिण्याचे पाणी देण्यासाठी ७० हजार कोटी रुपयांचे जल जीवन अभियान राबवित आहे. याअंतर्गत महाराष्ट्रासाठी २० हजार कोटी रुपये तर पुणे जिल्ह्यासाठी २ हजार कोटी रुपयांची कामे करण्यात येणार आहेत. शिरुर तालुक्यातील ३४ पाणी पुरवठा योजनेसाठी ५७१ कोटी ३८ लाख मिळाले आहेत. ही कामे दर्जेदार, वेळेत पूर्ण करावीत. त्यासाठी स्थानिकांनीही सहकार्य करावे, असे चंद्रकांत पाटील यांनी आवाहन केले.
चंद्रकांत पाटील म्हणाले कि, राज्य शासनाच्यावतीने नागरिकांना पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यावर भर देण्यात येत आहे. शिरुर-हवेली-दौंड तालुक्यातील गावांना जोडणारा भीमा नदीवरील पूल उभारणीबाबतची मागणी लवकरात लवकर मार्गी लावण्यात येईल. पुलाबाबतचा प्रस्ताव सादर करावा, अशा सूचनाही मंत्री पाटील यांनी यावेळी दिल्या.
लोकप्रतिनिधींनी स्थानिक विकासकामांसोबतच रोजगार निर्मितीवर भर दिला पाहिजे. त्यासाठी रोजगार निर्मितीच्या अनुषंगाने प्रस्ताव सादर केल्यास, जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून त्याला प्राधान्य देऊ, अशी ग्वाही देखील पाटील यांनी यावेळी दिली.
विठ्ठलवाडी पाणीपुरवठा योजना ११ कोटी ११ लाख रुपये खर्चाची असून या योजनेत विठ्ठलवाडी गावासोबत डाळवस्ती, वेगरेवस्ती, महानुभावमळा, चोरमाळवस्ती, भोसेवस्ती, मधलामळा, शिंदेवस्ती या वस्त्यांच्या समावेश करण्यात आला आहे. या योजनेत ५ हजार २७८ नागरिकांना शुद्ध पाणी देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
यावेळी आमदार अशोक पवार, उप विभागीय अधिकारी स्नेहा किसवे-देवकाते, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक शालिनी कडू, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता नंदू भोई, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप कंद तसेच संबंधित ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच आदी उपस्थित होते.