आरोग्यवारी ही माणसातल्या ईश्वराची सेवा, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते आरोग्यवारी अभियानाचा शुभारंभ
पुणे : संतांनी माणसातला देव ओळखण्याचा संदेश मानवजातीला दिला असून आरोग्यवारीच्या माध्यमातून माणसातल्या ईश्वराची सेवा घडते, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले.
निवडुंग विठोबा मंदिर येथे राज्य महिला आयोग आणि पुणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आरोग्यवारी अभियानाच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते.
पालकमंत्री पाटील म्हणाले, राज्य महिला आयोगाने अतिशय संवेदनशीलतेने हा उपक्रम सुरू केला आहे. मासिक पाळीसारख्या विषयाकडे बघण्याच्या समाजाच्या दृष्टिकोनामुळे याबाबतची समस्या मांडताना मनात संकोच असतो. त्यामुळे महिलांची ही समस्या लक्षात घेऊन महानगरपालिकेच्या सहकार्याने सुरू केलेला हा उपक्रम कौतुकास्पद आहे. समाजाच्या सहकार्याने शहरात अनेक ठिकाणी सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून देणारे यंत्र बसविण्याची गरज आहे, असे त्यांनी सांगितले.
पुणे शहरात जागा उपलब्ध झाल्यास सामाजिक उत्तरदायित्व निधीतून तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र रुग्णालय उभारण्यात येईल. महिलांच्या सुरक्षेच्या विषयावर लवकरच बैठक आयोजित करण्यात येईल, असेही पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले. वारीत स्वच्छतेचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सेवेचे त्यांनी विशेष कौतुक केले. प्रारंभी पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते आरोग्यवारी अभियान आणि महिलांसाठी तयार करण्यात आलेल्या कक्षाचे उदघाटन करण्यात आले.
कार्यक्रमाला राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, आमदार रविंद्र धंगेकर, मनपा अतिरिक्त आयुक्त रविंद्र बिनवडे, महिला आयोगाच्या सदस्य संगिता चव्हाण, प्रशांत जगताप आदी उपस्थित होते.