मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कोथरूडमध्ये गरजूंना मदत; रणजीत व लक्ष्मी हरपुडे यांच्याकडून विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

6

पुणे : राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कोथरूड मतदारसंघात केवळ देखावा न करता खऱ्या अर्थाने समाजोपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून आनंद साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमित्त फलकबाजी किंवा अनावश्यक खर्च न करता कार्यकर्त्यांनी समाजातील वंचित आणि गरजू घटकांना थेट मदत करावी, असे आवाहन मंत्री पाटील यांनी केले होते. त्यांच्या याच संकल्पनेला प्रतिसाद देत भाजप नेत्यांनी मतदारसंघात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले आहे.

मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या आवाहनाला मान देऊन कोथरूडमधील भाजप नेते रणजीत हरपुडे आणि लक्ष्मी हरपुडे यांनी गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे मोफत वाटप केले. या सामाजिक उपक्रमाला मंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्वतः आवर्जून उपस्थिती लावली. त्यांनी शालेय साहित्याचे वाटप करून विद्यार्थ्यांशी अत्यंत आपुलकीने आणि खेळीमेळीच्या वातावरणात संवाद साधला.

विद्यार्थ्यांशी संवाद साधताना आणि कार्यकर्त्यांचे कौतुक करताना मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, शिक्षण हीच आपल्या आयुष्याची आणि प्रगतीची खरी गुरुकिल्ली आहे. समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षणासाठी आवश्यक साधने वेळेत उपलब्ध व्हावीत, हे आपले कर्तव्य आहे. अशा लोकहितकारी उपक्रमांची प्रेरणा घेऊन पक्षाच्या अधिकाधिक कार्यकर्त्यांनी सामाजिक कार्यात हिररीने भाग घ्यावा, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. या प्रसंगी स्थानिक नागरिक, शिक्षक, विद्यार्थी आणि भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.