केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचे वडील किसनराव मोहोळ यांचे निधन; मंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले अंत्यदर्शन, संपूर्ण परिवाराचे केले सांत्वन
पुणे : केंद्रीय सहकार व नागरी विमानचालन राज्यमंत्री मुरलीधरजी मोहोळ यांचे वडील आदरणीय किसनरावजी मोहोळ यांचे काल रात्री दुःखद निधन झाले. या वेदनादायी वृत्ताने संपूर्ण पुणे जिल्ह्यात शोककळा पसरली आहे. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज कै. किसनरावजी मोहोळ यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेऊन त्यांना अत्यंत भावूक वातावरणात भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
अंतिम दर्शनानंतर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि त्यांच्या संपूर्ण परिवाराची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले आणि त्यांना या कठीण प्रसंगातून सावरण्यासाठी धीर दिला. वडिलांचे छत्र हरपणे ही माणसाच्या आयुष्यातील अत्यंत वेदनादायी आणि कधीही भरून न निघणारी मोठी पोकळी असते. या कठीण प्रसंगी आम्ही संपूर्ण मोहोळ परिवाराच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत, अशा शब्दांत त्यांनी आपल्या तीव्र शोकभावना व्यक्त केल्या.
कै. किसनरावजी मोहोळ यांच्या आठवणींना उजाळा देताना मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, किसनरावजींनी आपल्या जीवनात अनेकांना मोलाचे मार्गदर्शन केले आणि एक आदर्श कुटुंब घडवले. त्यांनी कुटुंबाला दिलेले प्रेम, उत्तम संस्कार, कष्टाची शिकवण आणि उच्च जीवनमूल्ये हीच त्यांची खरी ओळख होती. त्यांनी आयुष्यभर जपलेली माणुसकी आणि साधेपणा प्रत्येकाच्या मनात सदैव स्मरणात राहील.
ईश्वर बाबांच्या पुण्यात्म्यास सद्गती व चिरशांती देवो आणि मोहोळ कुटुंबाला हे अपार दुःख सहन करण्याची शक्ती प्रदान करो, हीच प्रार्थना, अशा शब्दांत मंत्री पाटील यांनी आपल्या संवेदना आणि प्रार्थना व्यक्त केल्या. याप्रसंगी पुण्यातील राजकीय, सामाजिक आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी उपस्थित राहून कै. किसनरावजी यांना अंतिम निरोप दिला.