मिलेनियम नॅशनल स्कूलमध्ये १० वी व १२ वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते गौरव
पुणे : मिलेनियम नॅशनल स्कूल, पुणे येथे इयत्ता १० वी आणि १२ वीच्या परीक्षेत उत्कृष्ट यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा अतिशय उत्साहात पार पडला. या सोहळ्यास राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विशेष उपस्थिती लावून यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार केला व त्यांना सन्मानित केले.
याप्रसंगी बोलताना मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या यशामागे केवळ त्यांचाच अभ्यास नसून, त्यांची स्वतःची जिद्द, पालकांनी दिलेले उत्तम संस्कार आणि शिक्षकांचे अथक परिश्रम यांचा खूप मोठा वाटा असतो. आज गौरव झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्याचे मनःपूर्वक अभिनंदन करताना त्यांनी विद्यार्थ्यांच्या भावी उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

हे सर्व विद्यार्थी आपल्या अर्जित ज्ञान, कौशल्य आणि अष्टपैलू कर्तृत्वाच्या बळावर आगामी काळात देशाच्या प्रगतीत मोलाचे योगदान देतील, असा ठाम विश्वासही मंत्री पाटील यांनी यावेळी व्यक्त केला. विद्यार्थ्यांनी यशाचा हा कौतुकास्पद प्रवास असाच अविरत सुरू ठेवत भविष्यात नवनवीन शिखरे सर करावीत, अशी सदिच्छा त्यांनी शेवटी व्यक्त केली.
या प्रसंगी उद्योजिका स्मिता पाटील, अॅड. तनिषा पाटील, विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.