नसरापूर बलात्कार व खून प्रकरणातील नराधमाला ५५ दिवसांत फाशीची शिक्षा; मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून पोलिसांसह न्याययंत्रणेचे आभार

10

पुणे : नसरापूर येथे एका निष्पाप चिमुरडीवर झालेला अत्याचार आणि तिची हत्या ही घटना अत्यंत संतापजनक आणि घृणास्पद होती, ज्यामुळे संपूर्ण देशभर शोक-संतापाची लाट उसळली होती. या ‘दुर्मिळातील दुर्मीळ’ प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत पुणे सत्र न्यायालयाने आरोपी भीमराव कांबळे याला मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली आहे. या ऐतिहासिक निर्णयाचे राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी जाहीर स्वागत केले आहे.

या संवेदनशील प्रकरणाची मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ गंभीर दखल घेतली होती. तपासात कोणतीही त्रुटी राहू नये आणि वेगाने तपास पूर्ण करावा, अशा कडक सूचना त्यांनी दिल्या होत्या. त्यानुसार, पोलिसांसह तपास यंत्रणांनी माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या गुन्ह्याचा तपास शर्थीने केला. न्यायालयात कोणतीही पळवाट राहणार नाही, असा भक्कम पुरावा सादर केल्यामुळे अवघ्या ५५ दिवसांत गुन्हा सिद्ध होऊन नराधमाला फाशीची शिक्षा मिळाली. एक माणूस म्हणून प्रत्येकालाच या कठोर निकालाचा निश्चितच आनंद झाला असेल, असे मत मंत्री पाटील यांनी व्यक्त केले.

या निकालातून महायुती सरकारने स्पष्ट संदेश दिला आहे की, महिला आणि बालकांविरोधात असे क्रूर गुन्हे करणाऱ्यांची गय केली जाणार नाही आणि त्यांना तात्काळ कठोर शिक्षा दिली जाईल. या गुन्ह्याचा काटेकोर तपास करून आरोपीला फाशीची शिक्षा मिळवून देणारे पोलीस प्रशासन, इतर तपास यंत्रणा आणि माननीय न्याययंत्रणेचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विशेष आभार मानले आहेत.

Get real time updates directly on you device, subscribe now.