कोथरूडमधील विकासकामांना मिळणार गती; मंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतला रस्ते आणि उद्यानांच्या प्रगतीचा सविस्तर आढावा
पुणे : आपल्या कोथरूड मतदारसंघातील पायाभूत सुविधांचा विकास आणि नागरिकांचे प्रश्न वेळेत सुटण्यासाठी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आज पूर्णपणे ॲक्शन मोडमध्ये पाहायला मिळाले. त्यांनी आज कोथरूड मतदारसंघातील विविध प्रलंबित आणि सुरू असलेल्या विकासकामांच्या प्रकल्पांची सद्यस्थिती, प्रत्यक्ष प्रगती आणि त्यामध्ये येणाऱ्या तांत्रिक अडचणींचा वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत सविस्तर आढावा घेतला. कस्पटे वस्ती, बाणेर-बालेवाडी येथील मिसिंग लिंक रस्ते, विविध डीपी रस्ते तसेच पंडित जितेंद्र अभिषेकी उद्यानासाठी आवश्यक भूसंपादन प्रक्रियेला गती देण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
यावेळी पाटील यांनी कोथरुडमधील वाहतूक कोंडी कमी करणे, नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देणे आणि प्रलंबित विकासकामे वेळेत पूर्ण करणे हेच आपले ध्येय असून, सर्व प्रकल्प जलदगतीने मार्गी लावण्यासाठी प्रशासनाला आवश्यक निर्देश दिले. तसेच पानशेत पूरग्रस्त वसाहतींसंदर्भातील निर्णयांची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबतही सूचना देखील त्यांनी केल्या.
या आढावा बैठकीस महापालिका आयुक्त नवलकिशोर राम, अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे, परिमंडळ ४ चे पोलीस उपायुक्त रजनीकांत चिरुमुल्ला, शहर मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर यांच्यासह महापालिकेच्या विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.